स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या ‘माऊच बारसं’ जोरदार ट्रेंडमध्ये असलेलं पाहायला मिळतं आहे. “मुलगी झाली हो” या मालिकेत विलास त्याच्या मुलीचं म्हणजेच माऊच नाव काय ठेवणार आहे याबाबत चर्चा सुरू आहे यानिमित्ताने स्टार प्रवाहवरील बहुतेक कलाकारांना त्यांच्या मुलांच्या नावामागची कहाणी नेमकी काय आहे याबाबत टॅग करून विचारण्यात आले आहे. नुकतेच अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या वडिलांनीही रुपली हे नाव ठेवण्या नावामागचे कारण सांगितले आहे. तर अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी देखील आपल्या लेकीच्या नावामागची एक गंमत चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनेत्री सुलेखा तळवलकर या दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत हे बऱ्याच जणांना परिचयाचे आहे. सुलेखा तळवलकर यांना जेव्हा मुलगी झाली त्यावेळी तिचे नाव ‘टिया’ ठेवायचे असे सुलेखा आणि त्यांचे पती अंबर तळवलकर यांनी निश्चित केले होते परंतु या नावाला स्मिता तळवलकर यांचा स्पष्ट विरोध होता. आपल्या नातीचे नाव मराठीच असावे असा त्यांचा हट्ट होता. त्यासाठी “दुर्गा” या नावावर त्यांनी शिक्कामोर्तबही केला. अगदी बारशाच्या वेळी देखील नातीचे नाव त्यांनी दुर्गा असेच ठेवले होते मात्र काही दिवसांनी बर्थ सर्टिफिकेट बनवण्यासाठी सखाराम मामांना बोलवण्यात आलं. घरचे सर्वजण टिया याच नावाने मुलीला सगळेजण खेळवायचे त्यामुळे सखाराम मामांनी मुलीचे नाव टियाच आहे असे समजून त्या नावाची दाखल्यावर नोंद करून घेतली. तिचे दुर्गा हे नाव आहे हे त्यांच्या कधी लक्षातच आले नाही. ही बाब जेव्हा स्मिता तळवलकर यांना समजली तेव्हा त्या सुलेखा आणि अंबरवर खूपच भडकल्या होत्या, त्यांचा खूप ओरडाही खावा लागला होता. आपल्या नातीच नाव त्यांना दुर्गाचं ठेवायचे होते टिया हे बंगाली किंवा परदेशी नाव आहे अस त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर मात्र त्यांच्या इच्छेखातर शाळेत टिया आणि घरी दुर्गा याच नावाने नातीला हाक मारली जाऊ लागली.