सोशलमीडियावर सध्या ज्या मऱ्हाठमोळ्या जोडीच्या लग्नाची धूम सुरू आहे ती जोडी म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. तुझ्यात जीव रंगला या पहिल्याच मालिकेने राणादा आणि पाठकबाई ही जोडी घराघरात लोकप्रिय झाली होती. साडेतीन वर्ष ही मालिका सुरू होती. या मालिकेत हार्दिक आणि अक्षया यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. पण प्रत्यक्ष आयुष्यात ही जोडी लग्न करेल असं काही प्रेक्षकांना वाटलं नव्हतं. यंदाच्या अक्षयतृतीयेच्या साडेतीनमुहूर्तावर अक्षया आणि हार्दिकने साखरपुडा केला आणि हा सुखद धक्का चाहत्यांना दिला. गेल्या सात महिन्यांपासून दोघांच्याही चाहत्यांना ज्या क्षणाचे वेध लागले होते ते म्हणजे हार्दिक आणि अक्षयाचं लग्नं कधी आणि कुठे होणार याचे. पण आता तर सोशलमीडियावर या दोघांच्या लग्नाच्या विधीचे फोटो आणि व्हिडिओ धुमाकूळ घालत आहेत. २ डिसेंबरला पुण्यातील एका ऐतिहासिक ठिकाणी हार्दिक आणि अक्षया यांचं लग्नं होणार आहे. पहा या दोघांनी लग्नासाठी नेमकं कोणतं ठिकाण निवडलं आहे.

हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नाची प्रत्येक गोष्ट अगदी खास आहे. अक्षयाने तिची साडी खास कारागिरांकडून विणून घेतली आहे. विशेष म्हणजे या साडीतले काही धागे हार्दिकनेही विणावेत अशी तिची इच्छा होती. हार्दिकने ही इच्छा पूर्ण केली असून अक्षयाच्या लग्नासाठीच्या लालसाडीच्या विणकामात हार्दिकचाही स्पर्श झाला आहे. हार्दिक आणि अक्षया यांच्या लग्नाची पत्रिकाही साधी पण खास आहे. पांढऱ्या रंगाच्या पत्रिकेवर चांदीचा पानसुपारीचा विडा लावण्यात आला आहे. या पत्रिकेचेही सध्या मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा आहे. गेल्या दोन महिन्यांपासूनच हार्दिक आणि अक्षया यांना त्यांच्या मित्रमंडळींकडून केळवणं सुरू झाली होती. दापोलीतील एका मैत्रिणीच्या घरी या जोडीला पहिलं केळवण केलं ते फोटो व्हायरल होताच हार्दिक आणि अक्षयाच्या लग्नाची सुपारी फुटल्याची चर्चा रंगू लागली. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील बरकतची भूमिका केलेला अमोल नाईक हा हार्दिकचा मित्र आहे तर अक्षया त्याला भाऊ मानते. अमोलनेही या जोडीला कोल्हापुरी केळवण केलं. शिवाय ऋता आपटे हिनेही या दोघांना मुंबईत केळवण केलं होतं. एकीकडे अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू असल्याचं सोशलमीडियावर झळकत आहे. सोशलमीडियावर अहा या हॅशटॅगमधून हार्दिक आणि अक्षया यांचं लग्नं ट्रेंडिग आहे. नुकतीच अक्षया आणि हार्दिकचा हळदी समारंभ पार पडला. अक्षयाच्या पुण्यातील घरी ग्रहमख विधीपासून लग्नविधींना सुरूवात झाली आहे तर हार्दिकच्या मुंबईतील घरी सर्व विधी सुरू आहेत. अक्षयाने नुकताच तिचा मेहंदी समारंभाचा व्हिडिओही शेअर केला आहे. मेंहदीसाठी अक्षयाने जांभळ्या रंगाचा टॉप आणि मल्टीकलर स्कर्ट घातला आहे. हार्दिक मात्र लग्नपूर्वीच्या विधींमध्ये पारंपरिक कुर्त्यामध्येच लक्ष वेधून घेत आहे.

अक्षया आणि हार्दिक यांनी त्यांच्या लग्नाच्या तयारीसाठी भरपूर वेळ घेतला आहे. गेल्या सात महिन्यापासून जसा वेळ मिळेल तशी त्यांची खरेदीही सुरू होती. काही महिन्यांपूर्वी ही जोडी एका सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनलाही जाऊन आली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातही काही खरेदी केली आहे. सर्वात महत्वाचं म्ह्णजे लग्न कुठे करायचं यावर त्यांनी खूप शोधमोहिम केली होती. जुलै महिन्यातच हार्दिक आणि अक्षया यांनी लग्नाचं ठिकाण ठरवण्यासाठी भटकंती केली. लग्नं पुण्यातच करायचं हे जेव्हा ठरलं तेव्हा त्यांनी पुण्यातील ऐतिहासिक ढेपे वाड्याची निवड केली. ढेपेवाडा हा पुण्यातील एक ऐतिहासिक वाडा असून या ठिकाणी अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचं लग्नं झालं होतं. तसेच अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनेही याठिकाणीच सात फेरे घेतले होते. ढेपे वाड्यात २ डिसेंबरला हार्दिक आणि अक्षयाचं लग्नं होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. यासाठी ढेपेवाड्यात सध्या पारंपरिक सजावट करण्याचं काम सुरू आहे. आता लग्नं ढेपे वाड्यात होणार म्हटल्यावर अक्षया आणि हार्दिीक यांचा लग्नातील लुकदेखील पारंपरिकच असणार हे नक्की.