यावर्षी मराठी सृष्टीत अनेक कलाकारांची लगीनघाई झाली तर अनेक कलाकार बाप देखील झाले. अभिनेता शशांक केतकरला काही महिन्यांपूर्वी पुत्ररत्न झाले, माझ्या नवऱ्याची बायको मधील सचिन देशपांडे याला कन्यारत्न झाले तर चला हवा येऊ द्या फेम अंकुर वाढवे यालाही कन्यारत्न प्राप्त झाले तर तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिणीसाहेब म्हणजेच धनश्री काडगावकर हिला काही महिन्यांपूर्वी पुत्रप्राप्ती झाली या सेलिब्रिटीसह अजून काही सेलिब्रिटी पुढील काही महिन्यात बाप बनणार आहेत. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याचा समावेश झालेला पाहायला मिळतो आहे. अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना आज कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या बातमीने अक्षय आणि योगितावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
बेधडक, बस स्टॉप, फत्तेशीकस्त, शिव्या, द स्ट्रगलर्स, होऊ दे जरासा उशीर अशा चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता अक्षय वाघमारे महत्वाच्या भूमिकेत झळकला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अक्षय आणि योगिता विवाहबद्ध झाले होते. दगडी चाळीत अगदी मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसमवेत त्यांचा हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी अक्षयने योगीताच्या डोहळजेवणाचे फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. यात आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे अरुण गवळी यांची दुसरी कन्या गीता देखील लवकरच आई होणार असल्यामुळे अरुण गवळी यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळतो आहे. दोन दिवसांपूर्वीच अरुण गवळी यांच्या घरी गीताचे ओटीभरण पार पडले होते. यावेळी अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांनी दोन्ही मुली आई होणार म्हणून ‘ लहान मूल देवाच्या रूपानं घरात येणार’ असे म्हणून आपला आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे म्हटले होते. या कार्यक्रमावेळी अक्षय आणि योगिता देखील उपस्थित होते. अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता यांना कन्यारत्न प्राप्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन !…