Home Movies प्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी झाले निधन…झी...

प्रसिद्ध अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज वयाच्या ८८ व्या वर्षी झाले निधन…झी मराठीवरील या अभिनेत्याचे होते आजोबा

3651
0
virajas kulkarni

आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते “जयराम कुलकर्णी” यांचे पुण्यामध्ये निधन झाले आहे. जयराम कुलकर्णी हे ८८ वर्षांचे होते. वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर आज दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मराठी सृष्टीतील त्यांच्या योगदानाचा आज आढावा घेऊयात…महेश कोठारेंच्या अनेक चित्रपटांत पोलिसांची भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या होत्या. आंबेजवळगे हे त्यांचे गाव मूळ गाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात छोटीशी नोकरी पत्करली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अगदी बालवयातच इयत्ता सातवीत असताना त्यांनी शाळेत “मोरूची मावशी” नाटकात मावशीची भूमिका साकारली.

कॉलेजमध्ये त्यांनी “अंमलदार” नाटकात “हणम्या” साकारला होता. १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे हातच्या नोकरीला त्यांना रामराम ठोकावा लागला होता. आकाशवाणीत काम करत असताना अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली होती याचाच फायदा चित्रपटात काम करताना त्यांना उपयोगी पडला. दे दणादण, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला गंमत जंमत, बाळाचे बाप ब्रह्मचारी सारख्या चित्रपटात सरपंच, पाटील, पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. घरात मावणार नाहीत इतकी बक्षिसे त्यांनी मिळवली होती. जयराम कुलकर्णी यांना पत्नी डॉ हेमा कुलकर्णी , मुलगा रुचिर आणि सून प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देव- कुलकर्णी आणि नातू अभिनेता विराजस कुलकर्णी आहे. विराजस सध्या झी मराठी वरील माझा होशील ना ही मालिका साकारत आहे. जयराम कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक दिग्गज कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. मराठी सृष्टीतील एक तारा निखळला अशा भावना आता व्यक्त होताना दिसत आहेत. जयराम कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here