मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत खाष्ट आणि कजाग सासू रंगवणाऱ्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे ४ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. ललिता पवार यांच्या पश्चात जर कोणी भारतीय चित्रपट सृष्टीत खलनायीका रंगवली असेल तर ती शशिकला यांनी असे म्हटले जाते. मराठीतील बहुतेक चित्रपटांमधून त्यांना खलयिकेच्याच भूमिका मिळाल्या असे म्हणायला हरकत नाही. एक बालकलाकार ते चित्रपटातील आजीच्या भूमिका त्यांनी आपल्या अभिनयाने चांगल्याच रंगवलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले त्याबद्दल थोडक्यात आढावा घेऊयात…
शशिकला यांचे पूर्ण नाव शशिकला जवळकर. महाराष्ट्रातील सोलापूर येथे त्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. शशिकला या वयाच्या ५ व्या वर्षापासूनच नृत्य सादर करत पुढे त्यांचे संपूर्ण कुटूंब मुंबईत दाखल झाले. इथे आल्यावर घरच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लागावा म्हणून धुणी भांडी करण्याची कामे केली. दिसायला अतिशय देखण्या असलेल्या शशिकला यांना बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिलेच नाही. बालकलाकार, सहनायिका , आई, खलनायिका ते प्रेमळ आज्जी अशा विविध भूमिकेतून त्या नेहमीच प्रेक्षकांसमोर आल्या. मधल्या काळात दिग्दर्शक असलेल्या ओम प्रकाश सैगल यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या परंतु त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी नव्हते असे म्हटले जाते. मुलिंच्या जन्मानंतर कौटुंबिक वाद वाढत गेल्याने त्या एका व्यक्तीसोबत परदेशात निघून गेल्या होत्या परंतु आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतला. इथे मात्र कुटुंबात अडकून राहण्यापेक्षा देवदर्शन आणि धार्मिक स्थळी जाऊन मन शांत करण्याचा प्रयत्न केला. मदर टेरेसा यांच्यासोबत राहून काही काळ त्यांनी रोग्यांची सेवा केली. त्यानंतर पुन्हा एकदा त्या मुंबईत येऊन हिंदी मालिका आणि चित्रपटातून सक्रिय झाल्या. आपल्या अखेरच्या दिवसांत त्या आपली मुलगी आणि जवयाकडे वास्तव्यास होत्या. काल ४ एप्रिल रोजी त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अचानकपणे एक्झिट घेतली ही चित्रपट सृष्टीला न रुचणारी बाब. त्यांच्या जाण्याने मराठी हिंदी सृष्टीतील एक तारा निखळला अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. शशिकला जवळकर सैगल यांना भावपूर्ण श्रद्धांजली…