झी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये काही दिवसांपूर्वी सौमित्र आणि राधिका यांचे लग्न झाले. मालिकेत सौमित्राची फॅमिली यापूर्वी पाहायला मिळाली नव्हतो पण आता त्याची आई आणि वडील दोघेही पाहायला मिळतात. “माझ्या नवऱ्याची बायको” मालिकेत सौमित्रच्या आईची दमदार एन्ट्री झाली आहे. राधिकाला आपली सून म्हणून पसंत करण्यासाठी हे पात्र नुकतेच या मालिकेत एन्ट्री करताना दिसले. सुरुवातीला गुरुनाथने सौमित्रच्या आईला राधिकाविरोधी कान भरण्यास सुरुवात केली परंतु त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी राधिकाला आपली सून म्हणून पसंत केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सौमित्रची आई साकारणारी अभिनेत्री ही तब्बल ४० वर्षांनी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळत आहे. हो , या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल…
कारण ही अभिनेत्री आहे अष्टविनायक चित्रपट फेम “वंदना पंडित”. अष्टविनायक या गाजलेल्या चित्रपटात सचिन पिळगावकर सोबत वंदना पंडित हिला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटातील “अष्टविनायका तुझा महिमा कसा… ” या गाण्यात आशा काळे, रवींद्र महाजनी, अशोक सराफ, उषा चव्हाण , जयश्री गडकर असे नामवन्त कलाकार झळकले होते तर राजा गोसावी, शरद तळवळकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. प्रथम तुला वंदितो, दिसते मजला आणि अजूनही या चित्रपटातील गाणी रसिकांच्या स्मरणात आहेत. घाशीराम कोतवाल हा आणखी एक चित्रपट वंदना पंडित यांनी साकारला होता. १९७९ साली अष्टविनायक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी ही अभिनेत्री माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.
वंदना पंडित यांचे लग्नानंतरचे नाव वंदना शेठ. त्यांना एक मुलगीही आहे तिचे नाव “ईश्वरी शेठ”. वंदना पंडित यांची मोठी बहीण “बकुळ पंडित उर्फ बकुल पंडित” या संगीत नाटकात काम करणाऱ्या ज्येष्ठ गायिका म्हणून ओळखल्या जातात. लग्नानंतर त्यांचे नाव ‘अलकनंदा वाडेकर’ .वंदना पंडित यांचे कुटुंबीय मूळचे वाईचे परंतु वडील हैद्राबादला वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्यांचे बालपण हैद्राबाद इथेच गेले. सचिन पिळगावकर सोबत अष्टविनायक चित्रपटात काम केल्यानंतर ही अभिनेत्री या क्षेत्रापासून दुरावली होती त्यामुळे बऱ्याच चाहत्यांनी तिच्याबाबत विचारणा केली होती. इतक्या वर्षांनी प्रेक्षकांसमोर आल्यामुळे तिच्या चाहत्यांना आता सुखद धक्का बसला आहे.