फोटोत बालपणीचे अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे दिसत आहेत त्यांच्यासोबत असलेला हा मुलगा देखील आज झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बहुतेकांनी हा चेहरा ओळखलाही असेल. चला तर मग जाणून घेऊयात या मुलाबद्दल अधिक… स्वानंदी आणि अभिनय बेर्डे यांच्यासोबत फोटोत असलेल्या या मुलाचे नाव “त्रियुग मंत्री”. झी मराठी वाहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत “रॉकीची” भूमिका त्रियुग मंत्री साकारत आहे.

आजवर अनेक पौराणिक तसेच ऐतिहासिक हिंदी मालिकांमधून त्रियुग मंत्रीने अनेक महत्त्वाच्या भूमिका बाजावल्या आहेत. मराठी सृष्टीपेक्षा हिंदी मालिकांमधून त्याला अभिनयाची अधिक संधी मिळत गेली हे विशेष. सीआयडी, संकटमोचन महाबली हनुमान, सम्राट अशोक , महाराणा प्रताप, विघ्नहर्ता गणेश या हिंदी मालिकांप्रमाणेच पेबॅक, नगरसेवक – एक नायक अशा चित्रपटातून तो झळकला आहे. त्रियुगचे वडील नितीन मंत्री हे देखील रंगभूमीवरचे जाणते कलाकार. १९६६ सालच्या ‘सरनोबत’ या नाटकातून त्यांनी अभिनय साकारला होता. तर त्रियुगची आई “सुलभा मंत्री” या देखील मराठी नाट्य सिने अभिनेत्री म्हणून परिचयाच्या होत्या. चोरबाजार, टपाल, धुमशान, पूर्ण सत्य, प्रेमासाठी वाट्टेल ते, आधारस्तंभ, भोळाशंकर, उतरण, दामिनी, आमची माती आमची माणसं, साराभाई व्हर्सेस साराभाई यासारख्या अनेक हिंदी मराठी चित्रपट तसेच मालिका आणि नाटकांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे यांच्यासोबत चित्रपटातून त्यांना झळकण्याची संधी मिळाली.
२०१३ साली वयाच्या ६३ व्या वर्षी सुलभा मंत्री यांचे निधन झाले. त्या कुडाळ येथे देवी दर्शनासाठी गेल्या असता तेथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले होते. आज त्रियुगचे आई वडील दोघेही हयात नसले तरी मराठी सृष्टीत त्यांचाही एक मोलाचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. आई वडील दोघेही कलाकार त्याचप्रमाणे त्याची बहीण “नेश्मा मंत्री चेंबूरकर” ही देखील प्रसिद्ध व्हॉइस ऍक्टर म्हणून सर्वपरिचित आहे त्याचबरोबर नेश्माची दोन्ही मुलं ‘सुमिर आणि रोमिर’ व्हॉइस आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. अनेक अनिमेशन फिल्म्स आणि परदेशी चित्रपटांचे डबिंग आर्टिस्टचे काम या कलाकारांनी केले आहे. त्यामुळे त्रियुगच्या संपुर्ण कुटुंबाची नाळ कलाक्षेत्राशी अगदी घट्ट जोडली गेलेली पाहायला मिळते. त्रियुग मंत्री येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून रॉकीच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला आहे त्याने साकारलेली ही पहिलीच मराठी मालिका यात रॉकीची भूमिका काहीशी विनोदी वलय असलेली दिसते त्यामुळे ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. या भूमिकेसाठी त्रियुगला खूप खूप शुभेच्छा…