येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका सध्या स्वीटू आणि ओमकारच्या लग्नाची बोलणी करण्यापर्यंत येऊन ठेपली आहे असे म्हणायला हरकत नाही. रॉकी आणि शकूने त्याचसाठी स्वीटूच्या घरी जाण्याचा घाट घातला आहे परंतु अमेरिकेहून आलेल्या स्थळामुळे शकू आपल्या मनातलं बोलून दाखवेल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. तुर्तास मालिकेतील विरोधी पात्र साकारणाऱ्या मालविकाबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…. मालिकेतील मालविकाचे पात्र विरोधी दर्शवले आहे. ही भूमिका साकारली आहे “अदिती सारंगधर” या अभिनेत्रीने.

जवळपास १५ वर्षाहून अधिक काळापासून अदिती सारंगधर मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. रामणारायन रुईया कॉलेजमधून तीने आपले पदवीचे शिक्षण घेतले. ‘लिटमस’ या एकांकिकेतून तिने साकारलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. पुढे दामिनी (ईटीव्ही), वादळवाट, माझे मन तुझे झाले, अभिलाषा, स्वराज्यजननी जिजामाता, हम बने तुम बने अशा टीव्ही मालिकांमधून तीने दमदार भूमिका साकारल्या. स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या लोकप्रिय मालिकेतून तीने सलोनी देशमुखची भूमिका आपल्या सजग अभिनयाने चांगलीच गाजवली होती. झी मराठीच्या फु बाई फु शोमधून तिने प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्नही केला. नाथा पुरे आता, चिंगी, उलाढाल, मोहोर, सूत्रधार, नवरा माझा भवरा या चित्रपटाच्या माध्यमातून ती मोठ्या पडद्यावर देखील झळकली. यातून बहुतेकदा तिच्या वाट्याला विरोधी भूमिकाच आलेल्या पाहायला मिळाल्या त्या भूमिका ही तिने तितक्याच ताकदीने पेलल्या. २५ मे २०१३ साली अदितीने सुहास रेवंडेकर सोबत प्रेमविवाह केला. या दोघांची लोणावळ्याला कॅफे कॉफी डे मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती. सुहास हा इंजिनिअर असून आजवर अनेक नावाजलेले प्रोजेक्ट त्याने साकारले आहेत. अरीन हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अरीन चे पालनपोषण व्यवस्थित व्हावे या हेतूने काही काळ तीने अभिनयातून ब्रेक घेतला होता.