झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत नुकतीच मोमोच्या पप्पांची एन्ट्री झाली आहे. मोमो आणि तिचे पप्पा दोघे मिळून खानविलकर कुटुंबाला कशा पद्धतीने फसवतात हे येत्या पुढील भागातच अधिक स्पष्ट होणार आहे. तुर्तास मालिकेत ओम आणि मोमोच्या एंगेजमेंटची जोरदार तयारी सुरू झालेली पाहायला मिळत आहे याच कारणास्तव मोमोच्या पप्पांची एन्ट्री करण्यात आली आहे. आज ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात… मालिकेत मोमोच्या पप्पांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचे नाव आहे “भरत सावले”. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ” गाव गाता गजाली” या मालिकेतून त्यांनी आबांची भूमिका साकारली होती.

भरत सावले हे रंगभूमीवरचे जाणते कलाकार म्हणून ओळखले जातात. सुरुवातीला हौशी नाटकांतून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती त्यानंतर १९९० साली प्रथमच त्यांना “हसत खेळत” या व्यावसायिक नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. त्यानंतर यदा कदाचित, केशवा माधवा, बायको असून शेजारी, दिवसा तू रात्री मी अशा विविध नाटकांतून त्यांनी आव्हानात्मक भूमिका साकारल्या. आपला प्रवास असाच चालू असताना एका ऍड शूटसाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं. फुटबॉल कोचच्या भूमिकेसाठी त्यांनी ऑडिशन दिली मात्र कोचच्या भूमिकेसाठी त्यांचे बेढब असलेले शरीर पाहून त्यांना रीजेक्ट केलं गेलं त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटलं होत मात्र लेखक, दिग्दर्शक, अभिनेते असलेले त्यांचे मित्र संतोष पवार याने त्यांना काम करण्याची संधी दिली वाढलेल्या पोटामुळं रिजेक्ट झालेल्या भरत यांना याच पोटामुळे यदा कदाचित नाटकात भिमाची भूमिका साकारण्याची नामी संधी संतोषने त्यांना दिली. भरत सावले यांनी साकारलेला भीम खूपच लोकप्रिय झाला. पुढे दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट, नाटकांतून त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळत गेला. आबांनी उडवला बार, पार्टी, गाव गाता गजाली, वैजू नं १ अशा मालिका आणि चित्रपटातून ते छोट्या आणि मोठ्या पडद्यावर चमकले. आता येऊ कशी तशी मी नांदायला या लोकप्रिय मालिकेतून त्यांना पुन्हा एकदा अभिनयाची संधी मिळाली आहे. मोमो आणि तिचे पप्पा मालविकाला आणि पर्यायाने खानविलकर कुटुंबाला कसे फसवतात हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरत आहे.