देवमाणूस मालिका एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. लवकरच डॉक्टर दिव्या सिंगच्या ताब्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्याला डॉक्टरविरोधात बरेचसे पुरावे मिळाले असल्याने डॉक्टरच खरा देवीसिंग आहे आणि गावात घडणाऱ्या घटनांमागे त्याचाच हात आहे हे आता तिच्या लक्षात आले आहे. देवमाणूस मालिकेत एकीकडे दिव्या सिंगचा सुरू असलेला तपास तर दुसरीकडे डिंपल आणि डॉक्टर अजितच्या लग्नाची लगबग या दोन्ही गोष्टी वेग घेताना दिसत आहेत. कालच त्यांच्या लग्नाचे शूटिंग पूर्ण देखील झाले असून लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

डिंपल आणि डॉक्टरच्या या लग्नाच्या सोहळ्यातच दिव्या सिंग डॉक्टरला अटक करणार आहे. येत्या ३१ मे रोजी देवमाणूस मालिकेचा शेवटचा भाग टेलिकास्ट केला जाणार आहे त्यामुळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे आता स्पष्ट झाले आहे. एवढे दिवस मालिकेतील सरू आज्जी, टोण्या, डिंपल ,बज्या, नाम्या, यासर्वांच्या अभिनयातून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झाले होते मात्र आता मालिका निरोप घेणार म्हटल्यावर काही चाहते काहीसे नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. देवमाणूस या मालिकेनंतर १०० डेज चा दुसरा सिजन सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र याबाबत झी वाहिनी लवकरच अधिकृत घोषणा करेल. त्याबाबत येत्या काही दिवसातच खुलासा केला जाईल. १०० डेजच्या पहिल्या सिजनमध्ये आदिनाथ कोठारे आणि तेजस्विनी पंडित हिने प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच येणाऱ्या दुसऱ्या सिजनमध्ये प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण होत आहे.