मराठी सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे एक दोन चित्रपट किंवा मालिका साकारून देखील आपल्या भूमिकांमुळे स्मरणात राहतात. परंतु असे स्मरणात राहिलेले कलाकार आज नेमके काय करत असतील आणि ते कुठे असतील याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. आज अशाच काही निवडक अभिनेत्रींबद्दल आपण जाणून घेऊयात ज्या अभिनेत्री गेल्या कित्येक वर्षांपासून या क्षेत्रापासून दुरावलेल्या पाहायला मिळतात…

१. कादंबरी कदम- वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी अभिनेत्री कादंबरी कदम हिने एका बालनाट्यामध्ये चिमणीच्या पिल्लाचे काम केले होते. रंगभूमीवर पदार्पण करत अनेक नाटकांतून तीने विविध भूमिका साकारल्या. परंतु तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती तीन बहुरानियॉं या झी टीव्हीवरील मालिकेतल्या तिच्या जानकीच्या भूमिकेमुळे. याशिवाय तिने कभी सौतन कभी सहेली आणि कहता है दिल ह्या मालिकांमधेही कामे केली आहेत. त्यापूर्वी तिने अवघाचि हा संसार, अकल्पित, इंद्रधनुष्य, तुजवीण सख्या रे, दीपस्तंभ या गाजलेल्या हिंदी, मराठी मालिकांतूनही काम केले होते. मराठीमधील टॅक्स फ्री या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालक बनली होती. ही पोरगी कोणाची, पटलं तर घ्या, क्षणभर विश्रांती या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. २०१६ साली अविनाश अरुण या सिनेमॅटोग्राफर सोबत ती विवाहबद्ध झाली. दृश्यम, किल्ला, हिचकी, कारवाँ अशा हिंदी, मराठी चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर म्हणून अविनाशने काम केले आहे. कादंबरी आणि अविनाश या दोघांना एक मुलगाही आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कादंबरी अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी आपला घरसंसार आणि मुलाचे संगोपन करण्यात ती गुंतलेली आहे.

२. नेहा गद्रे- मन उधाण वाऱ्याचे या मालिकेतून अभिनेत्री नेहा गद्रे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाली. त्यातील तिने साकारलेली गौरीची भूमिका खूपच लोकप्रिय झाली होती. अजूनही चांदरात आहे ही आणखी एक मालिका तिने अभिनित केली होती. मोकळा श्वास, गडबड झाली या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकली. गडबड झाली(२०१८) या चित्रपटानंतर ती कोणत्याही चित्रपट किंवा मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली नाही. त्यानंतर मार्च २०१९ साली ईशान बापट सोबत तीने लग्न केले. सध्या ती तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायिक आहे.

३. पल्लवी सुभाष- मराठी नाटक, चित्रपट तसेच मालिकांच्या माध्यमातून अभिनेत्री पल्लवी सुभाष हिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तेलगू, कन्नड चित्रपटासोबतच श्रीलंकेतील एका चित्रपटातूनही ती झळकली आहे. कुंकू झाले वैरी, असा मी अशी ती, महाभारत, तुम्हारी दिशा, चार दिवस सासूचे, आठवाँ वचन,आयला रे! या चित्रपट आणि मालिकेसोबतच कॉमेडी एक्सप्रेस शोचे सूत्रसंचालन तिने केले आहे . मागील काही वर्षापासून पल्लवी कोणत्याही चित्रपट किंवा मालिकेतून पाहायला मिळाली नाही त्यामुळे ती अभिनय क्षेत्रापासून काहीशी दुरावलेली दिसते.

४. रेश्मा नाईक- श्रीयुत गंगाधर टिपरे या गाजलेल्या मालिकेतून अभिनेत्री रेश्मा नाईक- किनारे हिने शलाकाची भूमिका साकारली होती. या एकाच मालिकेमुळे आजही रेश्मा प्रेक्षकांच्या स्मरणात राहीली आहे. परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की “श्रीयुत गंगाधर टिपरे” या मालिकेनंतर तिने “आधार” या २००२ सालच्या चित्रपटात आणखी एक भूमिका साकारली होती. तसेच त्यापूर्वी तिने स्मिता तळवलकर ह्यांची नुपूर हि मालिका देखील केली होती. नुपूर ह्या मालिकेमुळेच तिला श्रीयुत गंगाधर टिपरे ह्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. लग्नानंतर रेश्मा परदेशात स्थायिक झाली त्यामुळे तिला अभिनय क्षेत्रापासून दूरच राहावे लागले. पण ती अधून मधून पुण्यात येते पुण्यात आली कि ती ‘वेस्ट पुणे फेस्टिव्हल’ कोथरूड या खाद्यपदार्थांच्या इव्हेंट मध्ये नेहमी सहभाग दर्शवताना दिसते. आपल्या घर संसारात आणि मुलाच्या संगोपणात सध्या ती व्यस्त आहे.

५. नीलम शिर्के- वादळवाट, असंभव, चार चौघी, हसा चकटफु, कोपरखळी, राजा शिवछत्रपती अशा गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री नीलम शिर्के- सामंत छोट्या पडद्यावर झळकली. गंभीर भूमिका असो वा विनोदी त्या भूमिका तितक्याच ताकदीने तीने प्रेक्षकांसमोर उभ्या केल्या. गडबड गोंधळ, झक मारली बायको केली, पछाडलेला,चिंगी अशा चित्रपटातून तिने महत्वाच्या भूमिका बजावल्या. नीलम शिर्के सध्या आपल्या कुटुंबासोबत रत्नागिरी येथे स्थायिक आहे “अस्मि” हे तिच्या एकुलत्या एक मुलीचे नाव . अस्मिला नृत्याची विशेष आवड असून कथक नृत्याचे ती प्रशिक्षण घेत आहे. नीलम सध्या रत्नागिरीत स्थायिक असली तरी ती तिची आवड जोपासताना दिसते. वेगवेगळे पारंपरिक पदार्थ , मसाले, वळवणीतले पदार्थ बनवुन ते कसे बनवायचे हेही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर करताना दिसते.