मराठी सृष्टीत अनेक कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सांग तू आहेस का मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री दळवी हिचा साखरपूडा झाला तर अभिनेत्री सिद्धी पाटणे हिनेही आपले लग्न ठरल्याचे सांगितले. आता मराठी चित्रपट, मालिका अभिनेत्री “मयुरी वाडेकर” हिनेही नुकतेच लग्न केले असल्याचे समोर आले आहे. आज २४ जुलै राजी मयुरी वाडेकर तिच्या बेस्टफ्रेंडसोबत विवाहबद्ध झाली असून लग्न सोहळ्याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी मयुरीच्या घरी तिच्या लग्नाची लगबग सुरू झाली. मेहेंदी सोहळा, काल हळद आणि आज तिचा लग्नसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. अभिनेत्री मयुरी वाडेकर ही मूळची कोल्हापूरची असून तिचे शालेय शिक्षण मुक्ता सैनिक स्कुल कोल्हापूर मधून झाले. तर इंजिनिअरिंगचे शिक्षण तिने संजय घोडवत इन्स्टिट्यूट मधून घेतले आहे. ‘३५% काठावर पास’, ‘ वाजंत्री’ या चित्रपटातून तिने अभिनय साकारला आहे. कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेतूनही ती छोट्या पडद्यावर झळकली आहे. ‘मामाची पोरगी’ हा अल्बम तिने साकारला आहे. मारिया गोंसाळविस या शॉर्टफिल्मचा ती एक भाग बनली असून टिक टॉक सारख्या रील व्हिडिओजमधूनही ती नेहमी प्रेक्षकांसमोर आली आहे. आज मयुरी वाडेकर विवाहबद्ध झाली असल्याने तिच्या आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी तिला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…