Home News मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ह्या कारणामुळे आज आहेत अंथरुणाला खिळून

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ह्या कारणामुळे आज आहेत अंथरुणाला खिळून

5135
0
actress madhu kambikar shoking news
actress madhu kambikar shoking news

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “मधू कांबिकर” यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात… आज ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर आपल्या आजारपणामुळे चित्रपट सृष्टीपासून काहीशा दुरावलेल्या असल्या तरी त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आपल्याला त्यांच्या सजग अभिनयाची जाण करून देतात. मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार त्यामुळे मधू लहान असल्यापासूनच ते त्यांना आपल्या सोबतच घेऊन जात असत. तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. कलाक्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनपेक्षित यश संपादन केले.

madhu kambikar actress

एवढेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास उमजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे कार्य घडवून आणले. यात त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी मोठी मदत केली. यावर आधारित ” सखी माझी लावणी ” हा कार्यक्रम त्यांनी सादर केला. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच फळाला आला. १९८२ सालच्या “शापित” चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला रसिकांनी भरभरून दाद दिली. इथूनच त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आई ही प्रेक्षकांच्या विशेष संस्मरणीय ठरली. आज मधू कांबीकर कला क्षेत्रापासून दूर का आहेत त्याचे एक कारण आहे. पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला.

actress madhu kambikar

त्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या १२ वर्षांपूर्वी अशाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतरही त्यांनी आपली ही कला मंचावर सादर केली होती. याच आजारपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळून आहेत. २०१८ साली झी चित्र गौरव पुरस्कारावेळी मधू कांबीकर यांना मराठी सृष्टीतील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधू कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझे भाग्य असल्याचे सांगितले होते. मधू कांबीकर आजारापणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलिही प्रतिक्रिया किंवा हालचाल करत नाहीत परंतु त्यांचे एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यासारखे चित्रपट जेव्हा घरात टीव्हीवर लावले जातात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू तर कधी डोळ्यातून अश्रू वाहू लागतात…आपले संपूर्ण आयुष्य कला क्षेत्राला वाहिलेल्या या कलावंतिणीची अस्वस्थता सुनेच्या तोंडून ऐकल्यावर आपणही निःशब्द होऊन जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here