झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजींद या मालिकेत लवकरच राया आणि कृष्णाच्या लग्नाचा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी १७ ऑक्टोबर रोजी या मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. रविवारच्या संध्याकाळी ७ वाजता ह्या मालिकेचे प्रक्षेपण केले जाणार असल्याने मालीकेच्या चाहत्यांमध्ये या विशेष भागाची उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेत रायाचे लग्न होताच त्याची पहिली पत्नी मरणार असल्याचे गुरुजींनी सांगितले होते. त्यामुळे एका गरिबा घरच्या मुलीशी रायाचे पहिले लग्न लावून देण्याचा बेत गुली मावशी घालताना दिसत आहे. आपल्या शिक्षणामुळे कृष्णा आताच लग्न करणार नाही मात्र ती रायासोबत लग्नाला कशी तयार होणार हे पाहणे रंजक होणार आहे. कृष्णाच्या मामांचा या लग्नाला होकार असला तरी मामी तिच्या आताच लग्न करण्याच्या विरोधात आहे. या लग्नासाठी मामींचा होकार कसा मिळतो हेही लवकरच स्पष्ट होईल…

तूर्तास मालिकेत राया आणि अंतराच्या लग्नाची सुपारी फुटली आहे मात्र असे असले तरी या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये राया कृष्णा सोबत लग्न करताना दिसणार आहे मालिकेत हा ट्विस्ट नेमका कसा येतो ह्याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या मालिकेतील राया आणि कृष्णाच्या लग्न सोहळ्याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मालिकेच्या विवाह सोहळ्याच्या विशेष भागाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. या प्रोमोमध्ये कृष्णा आणि राया फेरे घेत असताना कृष्णाची साडी पेट घेताना दिसत आहे म्हणून गुरुजींनी वर्तवलेले भाकीत आता खरे ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लग्नावेळी ओढवलेल्या या संकटातून कृष्णा सुखरूप निसटणार का ? हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. राया कृष्णाला या संकटातून कसा वाचवेल हे येत्या काही भागातच स्पष्ट होईल पण तूर्तास मालिकेचा हा लग्नसोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले आहेत हे नक्की. मन झालं बाजींद ह्या मालिकेच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी अनेकांनी बाजींद म्हणजे काय, या नावाचा अर्थ काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला होता. बिनधास्त, बाजींद मनाचा राया प्रेक्षकांना देखील खूपच भावला. वैभव चव्हाण आणि श्वेता खरात यांनी या मालिकेत मुख्य भूमिका निभावल्या आहेत. दोघांची मालिकेत जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांना देखील खूपच आवडली आहे. मालिकेतील बरेचसे नवखे कलाकार आपापल्या भूमिका अगदी चोख बजावताना दिसत आहेत. गावरान बाज असलेल्या या मालिकेला महाराष्ट्राच्या घराघरातून लोकप्रियता मिळत आहे हेच या मालिकेच्या कलाकारांचे खरे यश म्हणावे लागेल.