आपल्या मराठी सिनेविश्वात आतापर्यंत अनेक विनोदी सिनेमे होउन गेले आहेत. अशातच आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दरम्यान सिद्धूच्या ‘अफलातून’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते. अशातच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला असून यामध्ये कॉमेडीचा बादशहा ‘जॉनी लिव्हर’ आणि त्याचा मुलगा ‘जेसी लिव्हर’ हे दोघं एकत्र झळकणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन परितोष पेंटर यांचे असून प्रोड्युसर रविराजकुमार आहेत. या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून सिद्धार्थ जाधवने टीजरचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा संपूर्ण चित्रपट विनोदावर आधारित असून, कॉमेडीचे बादशहा जॉनी लिव्हर हे त्यांचा मुलगा जेसी लिव्हरसोबत पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदाच बाप-लेकाची ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे चित्रपटात दोघेही बाप-लेक म्हणून दाखवले गेले आहेत.

या चित्रपटामध्ये जॉनी लिव्हर नवाब साहबच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि जेसी हा नवाब साहबचा मुलगा आफताबच्या भूमिकेत दिसणार असुन, हा चित्रपट 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे. सिद्धूने शेअर केलेल्या टीजरचा व्हिडियो पाहून अनेक प्रेक्षक चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहे. दरम्यान या चित्रपटामध्ये सिद्धार्थ आपल्याला एका अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ पहिल्यांदाच अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. त्यामूळे त्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहे.