कलर्स मराठी वाहिनीवर १४ जूनपासून “जीव माझा गुंतला” ही नवी मालिका प्रसारित होत आहे. घर आणि करिअर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारी अंतरा या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. नव्या दमाची मालिका म्हणून कलर्स वाहिनी प्रेक्षकांसाठी आगळे वेगळे कथानक या मालिकेद्वारे घरून येत आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता ही मालिका प्रसारित होत असल्याने सूर नवा ध्यास नवा हा शो आता लवकरच एक्झिट घेणार आहे. सूर नवा ध्यास नवा या मालिकेची महाअंतिम फेरी लवकरच होणार आहे. त्यामुळे ९.३० च्या वेळेत प्रेक्षकांचे मनरंजन करण्यासाठी ‘जीव माझा गुंतला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतली ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण याबाबत जाणून घेऊयात…

जीव माझा गुंतला मालिकेत अंतराचे पात्र साकारणारी अभिनेत्री आहे “योगिता चव्हाण”. योगिता चव्हाणला लहानपणापासूनच नृत्याची आणि अभिनयाची विशेष आवड होती. कॉलेजमध्ये असताना ती मराठी बाणा हा कार्यक्रम करायची. २०१६ साली श्रावण क्वीनचे उपविजेतेपद तिने पटकावले होते. योगिताची चंदेरी दुनियेत एन्ट्री झाली ती ओघानेच. एकदा सहज म्हणून तिने फेसबुकवर आपले अकाउंट उघडले. त्यावर काही फोटोही अपलोड केले. काही दिवसातच तिला दिग्दर्शक आनंद कुमार यांचा ‘माझ्या चित्रपटात काम करणार का’ असा मेसेज आला. पहिल्यांदा योगीताला हे सर्व खरे वाटत नव्हते कारण चंदेरी दुनियेत जायचे असल्यास तुम्हाला सहजासहजी कोणीच काम देत नाही. त्यानंतर तीने छोटीशी ऑडिशन दिली त्यात तिला सिलेक्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे ऑडिशनवेळी योगीताच्या दातांना तार बसवण्यात आले होती तरीही तिचे सिलेक्शन करण्यात आले होते ही गोष्ट तिच्यासाठी आश्चर्यकारक होती. “गावठी” चित्रपटातून तिने गौरीची भूमिका साकारली होती. हा तीने अभिनित केलेला पहिला चित्रपट ठरला. जाडूबाई जोरात, बापमाणुस, भाकरवडी (हिंदी मालिका) ,मुंबई आपली आहे, शिवा, अंधांडो पाटो(गुजराथी नाटक), मॉन्स्टर (वेब शो), नवरी मिळे नवऱ्याला अशा मालिका आणि चित्रपटातून योगीताने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय योगिताला मॉडेलिंगची आवड आहे. नामवंत ज्वेलर्स आणि काही कपड्यांच्या ब्रॅण्डसाठी तिने मॉडेलिंग केले आहे. जीव माझा गुंतला मालिकेतून ती अंतराच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. घर आणि शिक्षण अशी जबाबदारी पेलणारी अंतरा येणाऱ्या संकटाला कशी सामोरी जाते हे मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो आला असून येत्या काही दिवसात आणखी कोणकोणते कलाकार या मालिकेतून झळकणार आहेत याचा उलगडा होईल. तुर्तास अंतराच्या दमदार भूमिकेसाठी अभिनेत्री योगिता चव्हाणला खूप खूप शुभेच्छा…