सातारा वाई येथील दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या शिवाजी उर्फ सचिन ससाणे यांनी गिन्नाड चित्रपटात काम करण्यासाठी सयाजी शिंदे यांना साइन केले होते. त्याबदल्यात त्यांना त्यांच्या कामाचे ५ लाख रुपये अगोदरच देण्यात आले होते. मात्र पैसे देऊनही सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम केले नसल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे असे म्हणत ससाणे यांनी सयाजी शिंदे यांच्यावर आरोप लावले होते. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती. पहिल्या दिवशी सयाजी शिंदे केवळ सेटवर येऊन लगेचच दुसऱ्या कामासाठी निघून गेले होते. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा शूटिंगला आल्यावर स्क्रिप्ट व्यवस्थित नसल्याचे म्हटले आणि त्यात बदल करण्यास सांगितले.

डायरेक्टर शिवाजी उर्फ सचिन ससाणे यांनी या गोष्टीला नकार दाखवल्यावर सयाजी शिंदे यांना राग आला आणि त्यांनी चित्रपटासाठी लिहिलेले स्क्रिप्ट फाडून टाकले होते आणि पुन्हा त्यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तुझे पाच लाख रुपये देतो असे रागात बोलले मात्र ते कधी देतो म्हणतात तर कधी पैसे देणार नाही अशी धमकीही देतात. असा आरोप ससाणे यांनी सयाजी शिंदे यांच्यावर लावला होता. चित्रपट बनवण्यासाठी ससाणे यांनी लोकांकडून पैसे गोळा केले होते. मात्र आता हे झालेलं नुकसान सयाजी शिंदे यांनी भरून द्यावं अशी मागणी त्यांनी केली होती. माझ्या झालेल्या नुकसानाचे १७ लाख रुपये त्यांनी द्यावेत अशी याचना त्यांनी केली अन्यथा मला आत्महत्या करावी लागेल असेही ससाणे यांनी म्हटले होते. मात्र आता ह्या प्रकरणावर सयाजी शिंदे यांनी मौन सोडलेलं पाहायला मिळत आहे. सातारा पोलीस अधीक्षक त्यांच्याकडे फिर्याद देताना सयाजी शिंदे यांनी ससाणे यांचे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. उलट ससाणे यांनी माझ्या कामाचे २५ लाख रुपये द्यायचे होते त्यातले केवळ ५ लाख रुपयेच मला पोहोचले असे सयाजी शिंदे यांचे म्हणणे आहे. तीन दिवस मी चित्रपटाचं शूटिंग केलं आहे मात्र त्यांच्या स्क्रिप्ट मध्ये अनेक त्रुटी असल्याने मी त्यांना त्या बदलण्यास सांगितले होते.

चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच कमकुवत होती, त्यामुळे मी त्यात बदल करण्यास सांगितले होते. यावर ससाणे यांनी स्क्रिप्ट बदलण्यास थोडा वेळ लागेल असे म्हटले. यामध्ये खूप वेळ गेला. दरम्यान त्यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी मला माझ्या वेळेत बदल करावे लागले. यामुळे माझी इतर कामं रखडली . यातून माझे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. शिवाय ससाणे यांनी माझ्यावर चुकीचे आरोप लावले, माझी बदनामी केली . सोशल मीडियाच्या माध्यमातून ससाणे यांनी माझ्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली. रात्री अपरात्री फोन करणे, आत्महत्या करणार असल्याची धमकी देणे यामुळे मला मानसिक त्रास झाला आहे. असे सयाजी शिंदे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. सयाजी शिंदे यांच्या फिर्यादीनंतर या प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे.