बॉलिवूड चित्रपटात आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. १९ नोव्हेंबर २०२१ रोजी बंटी और बबली 2 हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री “शर्वरी वाघ” ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शर्वरी वाघ नक्की आहे तरी कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . चला तर मग तिच्याबद्दल माहीत नसलेल्या या काही खास गोष्टी जाणून घेऊयात… शर्वरी वाघ ही मुंबईतच लहानाची मोठी झाली. तिचे वडील शैलेश वाघ हे बिल्डर आहेत तर आई नम्रता वाघ या आर्किटेक्ट आहेत.

शर्वरीची बहीण कस्तुरी वाघ ही देखील आर्किटेक्ट आहे. अर्णव वाघ हा शर्वरी आणि कस्तुरीचा धाकटा भाऊ आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीने वयाच्या १६ वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती.२०१३ साली कॉलेजमध्ये असताना क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस काँटेस्टमध्ये तिने सहभाग घेतला होता. या काँटेस्टचे विजेतेपद तिने पटकावले होते. जेफ गोल्डबग स्टुडिओच्या विकेंड थिएटर वर्कशॉप मधून अभिनयाचे धडे गिरवले होते. सुरुवातीला व्यावसायिक जाहिरातीतून तिला झळकण्याची संधी मिळाली. चित्रपटात चांगली भूमिका मिळवण्यासाठी जवळपास ५ वर्षे ती ऑडिशन देत राहिली. शेवटी बॉलिवूडच्या ३ चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टरची भूमिका तिला मिळाली. प्यार का पंचनामा, बाजीराव मस्तानी, सोनू की टिट्टू की स्वीटी अशा ३ बॉलिवूड चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टरचे काम सांभाळले होते.

शर्वरी वाघ ही विकी कौशलचा भाऊ सनी कौशल ह्याला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूड सृष्टीत पाहायला मिळतात. एका मासिकाच्या कव्हर पेजवर शर्वरी आणि सनी कौशल एकत्रित झळकले होते तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. २०२० साली शर्वरी द फरगॉटन आर्मी या मिनी सिरीजमध्ये मायाच्या भूमिकेत दिसली. येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी शर्वरीचा प्रमुख भूमिका असलेला बंटी और बबली 2 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने शर्वरी प्रकाशझोतात आलेली पाहायला मिळत आहे. यापूर्वी देखील बॉलीवूड मध्ये अनेक कलाकार हे राजकीय घराण्यातून आलेले आहेत. पण अभिनेत्री म्हणून माजी मुख्यमंत्र्याची नातं पदार्पणाची हि पहिलीच वेळ असावी, पण राजकीय घराणं सोडून ती अभिनयात आणखीन कितपत यश मिळवते हे येत्या काही काळात स्पष्ट होईलच. असो बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…