बिग बॉस मराठी सीझन ४ च्या घरात ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत हिच्या एन्ट्रीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच या घरात चार वाईल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाली आहे. यात राखी सावंत, विशाल निकम, मीरा जगन्नाथ आणि आरोह वेलणकर यांनी घरात एन्ट्री घेतली आहे. घरातील सगळी सूत्र या चार ‘चॅलेंजर्स’ सदस्यांकडे गेली होती. आता विशाल आणि मीरा यांना या घरातून निरोप देण्यात आलाय, पण राखी सावंतने तिचा वट काही सोडलेला नाही. सध्या राखीच्या हातात निर्णय घेण्याची शक्ती आली असून, तिचे निर्णय ऐकून घरातील स्पर्धकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारच्या भागात शाई फेक कार्य होणार आहे. हे कार्य संचलित करण्याचं काम आरोह आणि राखी यांच्यावर सोपवण्यात आलं आहे.

शाई फेक टास्क तर रंगणार आहेच पण आरोह आणि राखी यांनी एकमेकांवर आरोपांची जी शाई फेकली आहे ती भन्नाट आहे. यापूर्वी एका मध्यरात्री विशाल निकम आणि राखी यांच्यातही असाच वाद रंगला होता. तेव्हाही मी माझ्या मर्जीने वागणार असं राखी म्हणताच इथे तुझी मर्जी चालणार नाही असं सांगत विशालने राखीचं तोंड बंद केलं होतं. आता नव्याने आरोह आणि राखीमध्ये जुंपलेल्या भांडणाने बिग बॉसच्या घरातील शांतता भंग झाली आहे. या व्हिडिओमध्ये आरोह आणि राखी यांच्यातील तू तू मै मै पहायला मिळणार आहे. आरोह असं म्हणतोय की, राखी सतत प्रत्येकावर कुरघोड्या करते. गळ्यात लिंबू मिरची लटकवते. प्रसिध्दी आणि चर्चेत राहण्यासाठी राखी हे सगळं करत असते. त्यावर राखी गप्पं बसणार नाही हे तर ओघाने आलेच. राखी म्हणतेय, की आरोह, मी तुझ्यासारखी पूर्ण दिवस झोपून राहत नाही. त्यावर आरोह म्हणाला की तुझ्या बापाचं काय जातं. त्यानंतर राखीने असं म्हटलय की, बापाचं नाव घेऊ नकोस. हा सगळा प्रकार सुरू असताना इतर सदस्य थोडा वेळ गप्पं होते मात्र आरोह आणि राखी यांच्यातील वाद शिगेला पोहोचताच काही सदस्यांनी मध्यस्थी केली.

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत येताच घरात एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. आतापर्यंत राखी सावंत ‘बिग बॉस हिंदी’मध्ये दिसली होती. मात्र, पहिल्यांदाच ती मराठीमध्ये झळकली आहे. आता या निमित्ताने प्रेक्षकांना देखील मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. रविवारच्या चावडीमध्ये महेश मांजरेकर यांनी राखीच्या तालावर नाचणारं आणि लोळणारं माकड असं म्हणत किरण माने याची शाळा घेतली होती. आता नव्या प्रोमोमध्ये राखी आणि आरोह या दोन चॅलेंजर्समध्येच जुंपली आहे. आज सोमवारच्या एपिसोडमध्ये राखी आणि आरोहमधलं भांडण पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. राही बॉग बॉसच्या घरात आपलं वेगळपण टिकवून राहण्याकरता दरवेळी काही ना काही करताना पाहायला मिळते. जेणेकरून प्रेक्षकांच्या ती कायम नजरेत राहील. पण तीच हे वागणं आता बिगबॉसच्या घरातील उपस्थित सदस्यांनाच रुचताना दिसत नाही.