बिग बॉसच्या घरातील सदस्य कीर्तनकार शिवलीला पाटील हिने काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शो मधून काही काळासाठी एक्झिट घेतली होती मात्र आता अजूनही दवाखान्यात तिच्यावर उपचार चालूच आहेत त्यामुळे तिने बिग बॉसच्या घरात पुन्हा जाण्यास साफ नकार दिला आहे. शिवलीलाच्या या निर्णयाचे प्रेक्षकांनी स्वागतच केले आहे. दरम्यान महेश मांजरेकर यांनी उत्कर्ष शिंदे च्या वागण्यावर आणि त्याने दिलेल्या निर्णयावर चांगलेच खडेबोल सुनावले होते.

महेश मांजरेकर यांनी एक ट्विस्ट आणून बिग बॉसच्या नॉमीनेट सदस्यांना ५ लाखांची ऑफर दिली होती. ५ लाख रुपये रक्कम असलेली एक बॅग घेऊन तो सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडू शकतो असे सांगताच अविष्कार दारव्हेकर याने ती बॅग उचलली आणि या शोतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र ती बॅग रिकामीच असल्याचे त्याच्या लक्षात आले. अविष्काने घेतलेल्या या निर्णयामुळे महेश मांजरेकर यांनी त्याला धारेवर धरले शिवाय तू हा शो चांगला खेळत नाहीस असेही सुनावले. महेश मांजरेकर यांच्या या वक्तव्यानंतर अविष्कार भावुक होऊन रडू लागला. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अविष्कार रडत असताना जवळच असलेल्या स्नेहा वाघला त्याने मिठी मारली त्यानंतर त्याने तिची माफी मागितली. स्नेहा वाघ ही अविष्कार दारव्हेकर याची पहिली पत्नी आहे. घरगुती हिंसाचाराच्या आरोपावरून त्यांनी घटस्फोट घेतला होता.

बिग बॉसच्या घरात असताना अविष्कार बऱ्याचदा स्नेहाशी बोलण्याचा आणि तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करताना दिसला होता मात्र स्नेहा त्याच्यापासून नेहमीच दूर राहिलेली दिसली. शिवाय यावरून स्नेहाने अविष्कारला खडसावले देखील होते. बिग बॉसच्या घरातील त्यांचा प्रवास अजून खूप लांबचा असला तरी येत्या काही दिवसात त्यांच्यात पुन्हा मैत्रीचे संबंध जुळून येतील का? हा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान महेश मांजरेकर यांनी दिलेली ऑफर स्वीकारून अविष्कार दारव्हेकरच्या घरातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. अविष्कार आता यापुढे चांगला खेळेल की काही दिवसातच प्रेक्षक त्याला घराबाहेर काढतील हे मात्र उत्सुकतेचे ठरणार आहे.