जिथे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाची क्रेझ अजूनही संपलेली नाही तिथेच आता आणखी एका कलाकाराची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत मात्र हे दोघे लग्नानंतरही सोशल मीडियावरून देवदर्शन करतानाचे फोटो प्रसिद्ध करून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. हार्दिक आणि अक्षया नंतर बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे याची देखील लग्नाची लगबग आतापासूनच सुरू झालेली पाहायला मिळत आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच येत्या बुधवारी सुमितच्या लग्नाचा सोहळा थाटात पार पडलेला पाहायला मिळणार आहे. आज त्याच्या घरी लग्नाच्या अगोदरच्या विधीला सुरुवात झालेली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुमितने प्रिवेडिंग फोटो शूट केले होते. त्यावरून तो लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चाहूल त्याच्या चाहत्यांना लागली होती. सुमित ज्या मुलीशी लग्न करतोय ती मुलगी म्हणजेच मोनिका महाजन ही आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. या दोघांचं हे अरेंज मॅरेज असणार आहे. बघण्याचा कार्यक्रम झाल्यापासूनच सुमित मोनिकाच्या प्रेमात पडला आणि तेव्हाच त्याने तिला आपला होकार देखील कळवला. लग्नाची खरेदी देखील त्याने काही दिवसांपूर्वीच केलेली आहे. तर दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री सिया पाटील हिच्या मुंबईतील एस सेन्स नावाने असलेल्या सलून मध्ये जाऊन सुमितने हेअर कट देखील करून घेतला होता. सुमित आणि मोनिकाचा लग्नातला लूक कसा असेल याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. सुमितने अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले होते. काही काळ त्याने या क्षेत्रात नोकरी केली होती आणि स्वतःच रेस्टॉरन्ट उभारायचं अशी त्याची मनापासून इच्छा होती मात्र कालांतराने तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कला क्षेत्रात दाखल झाला आणि हिंदी चित्रपटासाठी तो कामही करू लागला. अशातच त्याला चित्रपटातून अभिनयाची संधी देखील मिळाली. छोट्या छोट्या भूमिका साकारत असताना सुमित झी मराठी वाहिनीच्या लागीरं झालं जी या मालिकेत झळकला.

त्यानंतर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला मात्र प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा असा एक क्षण येतो तो क्षण सुमितच्याही वाट्याला आला. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतून त्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि हीच संधी त्याच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली. या मालिकेमुळे सुमित प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचला. गेल्या चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतून बाळू मामाच्या जीवनाचा प्रवास उलगडण्याचे काम सुमितने त्याच्या सजग अभिनयातून केले आहे. सुमीतचं लग्न अटेंड करायला त्याच्या मालिकेतील सहकलाकार मंडळींनी आतापासूनच त्याच्या घरी जाण्याची तयारी केली आहे. अभिनेत्री कोमल मोरे , वंदना पांचाळ हे कलाकार सुमितच्या लग्नासाठी रवाना झालेले आहेत. त्यामुळे मालिकेतील आणखी कोणकोणते कलाकार सुमितच्या लग्नाला हजेरी लावणार याचीही उत्सुकता आहे.