बिग बॉस मराठीचा चौथा सीझन म्हणजे वाद, भांडणं असं तुम्ही पाहिलं आहे ना. त्यात या घरातील सदस्य अपूर्वा नेमळेकर तर पहिल्या दिवसापासून वाद घालणारी स्पर्धक अशीच ओळख मिरवत आहे. आजच्या भागात अपूर्वाने कुणाची दुश्मनी केली ही चर्चाही सतत रंगत असते. पण याच अपूर्वाने चक्क बिग बॉसच्या घरातील मैत्रीविषयी तिचं मन मोकळं केलं आहे. अपूर्वाच्या आयुष्यात खूप कमी असलेली किंवा जवळजवळ नसलेली एक गोष्ट तिला बिग बॉसच्या घरात सापडली आहे आणि तिने ती कायम जपायची ठरवली आहे. २९ नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये हा किस्सा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. बिग बॉस मराठी या शोचा चौथा सीझन सध्या चांगलाच रंगात आला आहे. अपूर्व नेमळेकर हिच्या आयुष्यातील काही सहस्यांचा उलगडा आता ती स्वतः करताना पाहायला मिळत आहे.

आजपर्यंत जे स्पर्धक घराबाहेर गेले ते असोत किंवा सध्या जे या घरात सेफ आहेत ते असोत, त्यांच्यातील काहीजणांमध्ये वाद आहे तर काहीजणांचे छान सूर जुळले आहेत. टास्क कोणताही असला तरी अपूर्वा नेमळेकर कुणालातरी भिडतेच असं काहीचं चित्र अपूर्वाच्या बाबतीत निर्माण झालं आहे. पण याच अपूर्वाला आयुष्यात बऱ्याच काळानंतर मित्र मिळाला असं ती कबूल करताना दिसत आहे. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो रिलीज झाला असून यामध्ये अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि स्नेहलता वसईकर हे तिघंही या मैत्रीच्या नात्यावर बोलताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये अपूर्वा असं म्हणतेय की, जेव्हा मी या शोमध्ये यायचं ठरवलं आणि महेश मांजरेकर यांची पहिली भेट झाली तेव्हा मी त्यांना असं म्हणाले होते की मला जास्त मित्र नाहीत. मला मैत्री करायला आवडत नाही. प्रेम आणि मैत्री यावर माझा विश्वास नाही. पण इथे आल्यानंतर दोन महिन्यात मला अक्षयसारखा खूप जवळचा मित्र मिळाला. आपल्या मैत्रीवरून अनेकदा बोललं जातं. कधी चुकीचा अर्थही काढला जातो, पण मला आता त्याची पर्वा नाही. अपूर्वा असंही म्हणताना दिसत आहे की, माझा हा स्वभाव घरच्यांनाही माहिती आहे., त्यामुळे माझी कुणाशीतरी इतकी छान मैत्री होऊ शकते हे पाहून माझ्या घरचेही शॉकमध्ये असतील.

मैत्रीत खूप चटके खाल्ले आहेत. पण आता मला पुन्हा कुणावरतरी विश्वास ठेवावा असं वाटतंय. असं म्हणत असताना अपूर्वाला अश्रू आवरता आले नाहीत. अक्षय केळकरनेही अपूर्वासोबतच्या मैत्रीला दुजोरा दिला आहे. तोही असं म्हणतोय की, आपली मैत्री अशीच छान जपूया. बिग बॉस हा शो संपला तरी आपली मैत्री कायम राहिल. कितीही भांडलो तरी मैत्री राहील. भांडणं तर होत असतात. सध्या हा प्रोमो आणि त्यातील अपूर्वाने अक्षयसोबत केलेल्या मैत्रीविषयीच्या भावना सोशलमीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिगबॉसच्या घरात आल्यापासून इतर स्पर्धकांशी वाद आणि भांडताना पाहायला मिळाली. इतकंच नाही तर इतरांच्या भांडणात देखील ती नाक खुपसून आरओरडा करताना दिसली. त्यामुळे ती भांडकुदळ असल्याचं अनेकांचं मत आहे पण तिच्या पूर्वायुष्यात जे काही घडलं त्यानुसार आता ती वागताना पाहायला मिळतेय.