अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी हे पुण्यातील निगडी, प्राधिकरण परिसरात वास्तव्यास आहेत. तिचे वडील मनोहर कुलकर्णी हे सैन्यात सेवानिवृत्त डॉक्टर आहेत आणि त्यांनी 30 वर्षे आर्मी मेडिकल सेंटरमध्ये सेवा दिली. नुकतेच ‘वरलक्ष्मी’ या त्यांच्या राहत्या घरी एका चोरट्याने येऊन त्यांच्यावर हल्ला केला आहे. आज मंगळवारी २५ मे रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. चोराने केलेल्या चाकु हल्ल्यात सोनालीच्या वडिलांना जखम झाली आहे. त्यावर दवाखान्यात उपचार करून टाके घालण्यात आले आहेत.

याप्रकरणी सोनालीच्या वडिलांनी त्या चोराविरोधात पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार नोंदवली आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत वरलक्ष्मी बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डने सांगितले की, एक चोर प्लास्टिकची बंदूक , स्प्रे आणि चाकू घेऊन बिल्डिंगमध्ये शिरला. आत आल्यावर त्याने समोरच असलेल्या एका महिलेवर स्प्रे मारला स्प्रे मारल्यामुळे महिलेने आरडाओरडा केला. चोर वरच्या मजल्यावर जाताच सोनाली कुलकर्णीच्या वडिलांसोबत त्याची झटापट झाली. या झटापटीत सोनालीच्या वडिलांच्या हाताला त्या धारधार चाकूने गंभीर जखम झाली. ही घटना घडते तोवर सिक्युरिटी गार्डने स्थानिक नगरसेवक असलेले अमित गावडे यांना फोन करून ही सर्व हकीकत कळवली. नगरसेवक अमित गावडे यांनी ताबडतोब पोलिसांची मदत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तिथे जाताच ‘अजय विष्णू शेट्टे ‘ या चोराला त्यांनी ताब्यात घेतले. तपासात २४ वर्षीय अजय शेट्टे बीड जिल्ह्यातील असल्याचा खुलासा झाला आहे. आपल्या मागे पोलीस लागले होते म्हणून मी या बिल्डिंगमध्ये शिरलो होतो असा बनाव त्याने केला आहे. या चोराबाबत लवकरच अधिक तपास करण्यात येईल असे निगडी पोलिसांचे म्हणणे आहे. तुर्तास सोनालीचे वडील या घटनेत थोडक्यात बचावले असले तरी हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यावर टाके घालण्यात आहेत.