लागीरं झालं जी मालिकेतून पुष्पा मामींची भूमिका गाजवलेल्या अभिनेत्री कल्याणी चौधरी यांनी आपल्या आई साठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. झी मराठीच्या लागीरं झालं जी या लोकप्रिय मालिकेनंतर त्यांनी राजा राणीची गं जोडी या मालिकेत काम केले आहे. आज नर्स असलेली आपली आई सेवानिवृत्त झाली या तिच्या संपूर्ण प्रवासात अनेक संकटांना तिला सामोरे जावे लागले आईचा हा संघर्ष कल्याणी चौधरी यांनी आपल्या भावनापूर्ण शब्दांमध्ये व्यक्त केला आहे या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या आईबद्दल काय लिहिले आहे ते पाहुयात…. “आई….आज तु शासकीय रुग्णालयातुन सुपरवायझर म्हणुन सेवा निवृत्त झालियेस…पण अगं हे सगळं कागदोपात्री…कारण मला माहित आहे

तुझी ड्यूटी जरी तुझ्यापासुन आज विभक्त झाली असली तरी तु काय तिला ईतक्या सहजासहजी सोडायची नाहीस,म्हणुन तर म्हणतेय ना एकवेळ सेवा तुझ्यापासुन निवृत्त होईल पण तु काही तुझ्या आतुन सेवेला निवृत्त करणार नाहीस अगदी तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत…कारण तु हाडाची नर्स आहेस,तुझं उभं आयुष्य तु तुझ्या कामाला आणि कर्तव्याला वाहून दिलयेस हे आम्ही लहानपणापासुनच पाहत आलोय.तुझी हिच जिद्द आणि चिकाटी आम्हा दोघी बहिणींमध्ये आलिये,परिस्थिती कशीही असली तरी शेवटपर्यंत हरायचं नाही लढत रहायचं हेच तु आम्हाला कायम शिकवत आलियेस. पोटचं पोर गेल्यावर आभाळाएवढं दुःख कोसळुनही तु पुन्हा सावरलीस कंबर कसुन पुन्हा कामाला सुरुवात केलिस,एवढं होऊनही तुझ्या कामात जरासुद्धा कचुराई नाही केलिस गं आई.कुठून आणि कसं मिळवलस गं हे धैर्य? सांग ना आई…खरंच तुझ्याकडे पाहुनच हळु हळु शिकतेय,तुझ्यासारखं १० % जरी जमलं ना मला तर माझ्या लेकीची आई म्हणुन माझंही जिवन सार्थकी होईल गं.कारण मलासुद्धा माझ्या लेकिसमोर तुझ्यासारखाच आदर्श ठेवायचाय. पण खरं सांगु का,तु आता सक्तीची विश्रांती घे आई तुला काय हवं नको ते हक्काने तुझ्या लेकिंना सांग,माग म्हणनार नाही कारण जे काही दिलयेस ते सगळं तुझंच आहे,केलिस ना सगळ्या दुनियेची सेवा, आता आम्हा लेकिंना पण तुझी सेवा करुन थोडं पुण्य पदरात पाडु दे की.आणि हो ह्या कठीण प्रसंगाच्या काळात आम्हा दोघींनाही तुझी तुझ्या भक्कम आधाराची खूप गरज आहे गं आई. तुला आयुष्यभरासाठी मिळालेल्या ह्या हक्काच्या सुट्टीसाठी आणि तुझ्या सेकंड ईनिंगसाठी तुला खुप खुप शुभेच्छा.-तुझीच,
तनु उर्फ कल्याणी”