काही दिवसांपूर्वीच मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता वरद चव्हाण याने लवकरच बाबा होणार असल्याची बातमी शेअर केली होती. पत्नी प्रज्ञासोबतचे काही खास फोटो त्याने यावेळी शेअर केले होते. आज वरद आणि प्रज्ञाला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. आपल्या लेकीला हातात घेऊन त्याने एक क्यूटसा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही गोड बातमी पाहून आदिनाथ कोठारे तसेच मराठी सेलिब्रिटींनी त्याचे अभिनंदन केले आहे. २०१८ साली वरदने प्रज्ञा गुरवशी लग्न केले होते. विजय चव्हाण यांना आपल्या मुलाचे लग्न पहायची ईच्छा होती मात्र त्यागोदरच अभिनेता विजय चव्हाण यांचं फुफ्फुसाच्या दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले होते.

महेश कोठारे आणि विजय चव्हाण यांच्या मैत्रीचे किस्से तुम्ही ऐकले असतील. त्यांच्या बहुतेक चित्रपटातून विजय चव्हाण यांना भूमिका ठरलेली असायची. लक्ष्मीकांत बेर्डे पाठोपाठ त्यांच्या चित्रपटात हमखास आलेली व्यक्ती ती म्हणजे विजय चव्हाण जे ठरलेलं गणित असायचं. त्यामुळे या कोठारे आणि चव्हाण कुटुंबाचं नातं तेवढंच घनिष्ठ असायचं. विजय चव्हाण यांनी मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात भरीव योगदान दिले होते. मोरूची मावशी नाटकातील त्यांनी साकारलेली स्त्री व्यक्तिरेखा तर विशेष कौतुकास्पद ठरली होती. अनेक नाटक आणि चित्रपटातून त्यांनी रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन केलं. वरद चव्हाण हा त्यांचा एकुलता एक मुलगा. मराठी सृष्टीत खूप कमी लोकांना माहीत होतं की वरद हा विजय चव्हाण यांचा मुलगा आहे. विजय चव्हाण यांनी वरदला त्याच्या करिअरबाबत अनेक महत्वाचे सल्ले दिले होते. परंतु तुझा हा प्रवास सुरू करताना तू विजय चव्हाण यांचा मुलगा म्हणून नाही तर वरद चव्हाण म्हणूनच सुरू करायचा असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. या प्रवासात येणारं यश आणि अपयश हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून असेल.

मी एक बाप म्हणून सदैव तुझ्या पाठीशी असेन. पण एक सुपरस्टारचा मुलगा म्हणून अजिबात नाही. याच कारणामुळे वरदला कुठल्याही चित्रपट किंवा नाटकातून काम मिळवून द्या म्हणून बोलले नाही. सुरुवातीला या गोष्टीचा वरदला खूप राग आला होता. इंडस्ट्रीत बाबांचं एवढं मोठं नाव असल्याने मला त्यांच्यासारखं जमेल की नाही या प्रश्नांनी वरदला भांबावून सोडलं होतं. मात्र त्यावर विचार केल्यानंतर बाबांचा निर्णय अगदी योग्य आहे हे त्याला पटले. लेक माझी लाडकी, ललित २०५, १०० डेज, अजूनही चांद रात आहे, खो खो, ऑन ड्युटी २४ तास, श्रीमंत दामोदरपंत, धनगरवाडा, आई मायेचं कवच अशा चित्रपट, मालिकेतून तो स्वतःच्या कर्तृत्ववावर स्थान निर्माण करताना दिसला. अभिनेता वरद चव्हाण पत्नी प्रज्ञा याना कन्यारत्न प्राप्तीसाठी खूप खूप शुभेच्छा…