अनेकांनी ताज हॉटेल मध्ये जाण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे मात्र हे स्वप्न सत्यात उतरवणं तेवढंच कठीण आहे. मालिका चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका साकारणाऱ्या हेमांगी कवीला देखील या हॉटेलची भुरळ पडली आणि एक दिवस तिने हा अनुभव घेतला. ताज हॉटेलची तीची ती पोस्ट तुफान चर्चेत आली होती. हेमांगी कवी नंतर मालिका, चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता प्रवीण डाळिंबकर याने देखील असाच काहीसा सुखद अनुभव घेतलेला आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत प्रविणने गुरूनाथच्या ऑफिसमधल्या चपराश्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका विशेष गाजली होती. प्रवीण डाळिंबकर मुळचा औरंगाबादचा, तेथील विवेकानंद महाविद्यालयात प्रा. दिलीप महालिंगे यांच्या मार्गदर्शनामुळे तो नाटकाकडे वळला. नाटकात काम करायचे असेल तर अभिनयाचे बारकावे शिकावे लागणार यासाठी त्याने २००७ साली मुंबई गाठली.

मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात त्याने प्रवेश मिळवला. दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर पहिली संधी मिळाली ती अभिषेक बच्चनसोबतच्या जाहिरातीत. शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहोल्ला या नाटकाने प्रविणला खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आणले. या नाटकाला विरोध जरी झाला असला तरी देशभरात याचे अनेक प्रयोग करण्यात आले. या नाटकात त्याने यमची भूमिका साकारली होती. नशीबवान, चला हवा येऊ द्या अशा चित्रपट, मालिका, रिऍलिटी शोमधून तो स्थिरावला. मध्यंतरी झालेल्या अपघातातून सावरण्यासाठी ‘शिवाजी अंडरग्राऊंड…’मधील सहकाऱ्यांनी दिलेली साथ आणि झी मराठीने केलेली मदत फार मोलाची असल्याचे तो सांगतो. अपघातामुळे प्रविणला तीन महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले होते. त्यावेळी पसंत आहे मुलगी सीरियल सुरु होती. मात्र दिग्दर्शकांनी दरम्यानच्या काळात कोणालाही कास्ट केले नव्हते हे तो न विसरता सांगतो. प्रविणकडे आता आणखी एक चित्रपट आहे लवकरच तो नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिरयाणी या चित्रपटात झळकणार आहे. या प्रवासात तो आपल्या पत्नीला आणि मुलीला घेऊन नुकताच मुंबईत दाखल झाला. अर्थात याला कारणही तसेच खास होते, त्याच्या एक वर्षाच्या लेकीचा म्हणजेच राहीचा वाढदिवस होता. वाढदिवस मोठा करायचा नाही हे त्याने अगोदरच निश्चित केले होते, कारण त्यामुळे बाळाला आणि आईला तो क्षण साजराच करता येत नाही.

मग त्यासाठी तो गावाहून पत्नी प्रज्ञाला आणि राहिला घेऊन मुंबईत आला. एक दिवस मस्त मजेत घालवत त्यांनी राहिसाठी शॉपिंग केली, गेट वे पाहिला . जवळच असलेल्या ताज कडे हे दोघे बघत होते. भूकही लागली असल्याने प्रविणने ताजमध्ये जायचा निर्णय घेतला. सहाजिकच प्रज्ञाने त्याच्या या निर्णयाला विरोध दर्शवला मात्र बाहेरून इतके दिवस न्याहाळलेला ताज आतून कसा आहे? हे आज पाहूच असे प्रविणने मनाशी पक्के केले. मुलीचा पहिलाच वाढदिवस असल्याचे सांगत छोटासा केक आणि डीनरची ऑर्डर त्याने दिली . जेवण झालं, बिल देखील भरलं आणि मग राहिसाठी एका खास केकची अरेजमेंट देखील झाली. ‘आणि ताजने राहिसाठी केक दिला…कित्येक दिवसांची ईच्छा आज राही आणि प्रज्ञामुळे पूर्ण झाली’ असे म्हणत प्रसन्न चेहऱ्याने त्यांनी ताजचा निरोप घेतला. ताजचा हा अनुभव प्रविण आणि त्याच्या कुटुंबासाठी सुखावणारा ठरला असला तरी त्यामागच्या त्याचा भावुक क्षण मुळीच लपलेला नव्हता याची जाणीव त्याच्या या दिलखुलास पोस्टमधून होते.