आई कुठे काय करते मालिकेत गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता कोण अशी चर्चा रंगत असताना अनेक कलाकारांची नावे पुढे आलेली पाहायला मिळाली. अरुंधतीच्या मित्राची भूमिका अभिनेता समीर धर्माधिकारी साकारणार अशीही चर्चा झाली होती मात्र या गोष्टीचा आता नुकताच उलगडा झाला असून ती भूमिका अभिनेता ओंकार गोवर्धन साकारणार असल्याचा शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळतो आहे. मालिकेत लवकरच अरुंधतीच्या मित्राची एन्ट्री होत आहे.

आशुतोष केळकर हा अरुंधतीचा मित्र तिला तब्बल २६ वर्षांनंतर भेटणार आहे. आशुतोष आणि अरुंधती हे दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. आसनी कित्येक वर्षानंतर त्यांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे. या भूमिकेची उत्कंठा प्रेक्षकांइतकीच ओंकार गोवर्धनला देखील लागून राहिली आहे. आशूतोषच्या येण्याने अरुंधतीचे आयुष्य कसे बदलून जाते याची उत्सुकता प्रेक्षकाच्या मनात निर्माण झाली आहे. ओंकार गोवर्धन हा मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेता आहे. राधिका आपटे सोबत घो मला असला हवा या चित्रपटात नायकाची भूमिका त्याने बजावली होती. याच चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम पाहिले होते.सोनी मराठी वाहिनीवरील सावित्रीजोती या मालिकेत त्याने मुख्य भूमिका बजावली होती. नीळकंठ मास्तर, डोक्याला शॉट, ऋण, संशय कल्लोळ,दिठी, चुभन अशा चित्रपटातून त्याने साकारलेल्या भूमिकांचे नेहमीच कौतुक झाले आहे. नीळकंठ मास्टर चित्रपटातलं पूजा सावंत सोबत चित्रित झालेलं गाणं अधीर मन झाले… हे खूपच लोकप्रियता मिळवून गेलं. महादेव भाई, शाही पेहरेदार यासारख्या हिंदी मराठी नाटकांतून ओंकार चमकला होता.

कमीने या बॉलिवूड चित्रपटाने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. कॉलेजमध्ये असल्यापासूनच ओंकार एकांकिका स्पर्धांमधून सहभागी व्हायचा. मराठी सृष्टीतील एक दमदार नायक अशी ओळख त्याने निर्माण केली आहे. झी युवा वरील लव्ह लग्न लोच्या या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर आगमन केले होते. त्याने अभिनित केलेली सावित्रीजोती ही मालिका देखील विशेष महत्वाची ठरली मात्र कथानक दमदार असूनही अल्पसा प्रतिसाद मिळाल्याने ही मालिका आटोपती घेण्यात आली होती. तुषार गुंजाळ लिखित स्टोरी टेलवर ६१ मिनिट्स ही कथा सांगितली होती. या उत्कंठा वाढवणाऱ्या कथेमध्ये मुक्ता बर्वे, उमेश कामत सोबत गोवर्धनला काम करण्याची संधी मिळाली. या कथेला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. ओंकार आता लवकरच आई कुठे काय करते मालिकेत दाखल होणार आहे. अरुंधतीचा मित्र आशुतोष केळकरच्या येण्याने अनिरुद्ध ची मनस्थिती कशी होईल याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या भूमिकेसाठी अभिनेता ओंकार गोवर्धन याला खूप खूप शुभेच्छा…