श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकटफु, श्रीमंत दामोदरपंत, सही रे सही, घडलंय बिघडलं या आणि अशा कित्येक कलाकृती केदार शिंदेने प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत. त्याने केलेल्या प्रत्येक कलाकृतीतून त्याच्या अफाट विनोदबुद्धीचे दर्शन वेळोवेळी झालेले पहायला मिळते. केदार शिंदे रविवारी ९ तारखेला पुन्हा एकदा विवाहबद्ध झाल्याने तो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. पत्नी बेला सोबत पुन्हा एकदा लग्न करण्याचेही यावेळी एक खास कारण आहे. बेला आणि केदारने ९ मे रोजी २५ वर्षांपूर्वी कोर्टमॅरेज केले होते. कॉलेजमध्ये असताना केदार आणि बेला यांचे प्रेम जुळून आले होते. मात्र त्यांच्या लग्नाला बेलाच्या घरच्यांकडून विरोध होणार असे कळल्यावर या दोघांनी कोर्टमॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता.

भरत जाधव, अंकुश चौधरी हे त्याचे कॉलेजचे खास मित्र केदार आणि बेलाच्या लग्नात या सर्वांचा पाठिंबा त्यांना मिळाला असल्याने २५ वर्षांपूर्वी त्यांनी हे धाडस करण्याचे ठरवले यावेळी कुठलाच मुहूर्त त्यांनी पाहिला नव्हता ना हळद ..ना कुठले साग्रसंगीत त्यांना पाहायला मिळाले नव्हते. त्यावेळी लग्नामध्ये कुठलीच हौस करता आली नाही याच कारणास्तव त्यांना हा सर्व अनुभव पुन्हा एकदा नव्याने घ्यायचा होता. त्यामुळे आपल्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुन्हा एकदा लग्नागाठ बांधण्याचे त्यांनी ठरवले. यावेळी अनुभव न घेतलेले सर्व विधी त्यांनी साग्रसंगीत पूर्ण केले. रविवारी केदारने आपल्या राहत्या घरीच दुसऱ्या लग्नाचा सोहळा साजरा केला आहे. सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांनी बेलाच्या बाजूने तिचे कन्यादान केले. लग्नात केदार आणि बेलाने मनसोक्त खरेदी केलेली दिसून आली. त्यांच्या या दुसऱ्या लग्नाला ऑनलाइन मित्रमंडळी आणि नातेवाईक या सर्वांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. केदार आणि बेला ची मुलगी सना शिंदे हिने आपल्या आई वडिलांची लग्नात राहिलेली ही ईच्छा पूर्ण केली आहे असे ती एका पोस्टद्वारे म्हणते आहे. आई वडिलांच्या विवाहाबद्दल तिने एक पोस्ट लिहून त्यांना गोड शुभेच्छाही दिल्या आहेत. ना कुठल्या आणाभाका, ना कुठला सोहळा असे म्हणून काल पार पडलेल्या त्यांच्या विवाह सोहळ्याला मराठी सृष्टीकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.