आई कुठे काय करते मालिकेला धक्कादायक वळण लागले आहे. सोमवारच्या भागात अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या घटस्फोटाला कोर्ट परवानगी देणार आहे. इथून पुढे अरुंधतीचा प्रवास कसा असेल? ती आपल्या मुलांना सोडून नेमकी कुठे जाणार? हा प्रश्न आता मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे. आई कुठे काय करते ही मालिका एका बंगाली मालिकेचा रिमेक आहे. त्यामुळे या मालिकेचे कथानक ठरलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून आई कुठे काय करते या मालिकेत अनेक हळवे क्षण पाहायला मिळत आहेत. आपले कुटुंब सोडून जाताना आईच्या मनातील भावना कशा असतील याचे सुंदर चित्र मालिकेने टिपले आहे. आई आणि मुलांची ही अखेरची भेट प्रेक्षकांना खूपच भावुक करून जाणारी आहे.

आई आपल्याला सोडून जाणार या भावनेनेच तिची तिन्ही मुलं तिला निरोप देण्यासाठी बराचवेळ खोलीबाहेर येत नाहीत. हे पाहून आपल्या मुलांना भेटण्यासाठी आसुसलेली अरुंधती त्यांच्या खोलीकडे जाते. ईशाला भेटल्यावर ती घरातील जबाबदारी तिच्यावर सोपवते. आई मुलांच्या मनातील त्यांच्या घट्ट नात्यातील हे क्षण मालिकेत अत्यंत भावुक दर्शवले आहेत. आता लवकरच अरुंधती घर सोडून जाणार असल्याने ती आता कुठे जाणार? असा प्रश्न उपस्थित होतो. तर दुसरीकडे अरुंधती घराबाहेर पडणार म्हटल्यावर संजना खूप खुश झालेली पाहायला मिळणार आहे. अरुंधती कधी घराबाहेर पडतीय याचिच वाट ती आपल्या खिडकीतून पाहत आहे. यानंतर अनिरुद्ध आणि संजना एकत्र येतील आणि त्यांचा संसार थाटतील. मात्र कित्येक दिवसांपासून ठावठिकाणा नसलेली अरुंधती पुढे जाऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच गायन क्षेत्रात मोठे नाव कमावणार असल्याचे सांगितले जाते. अरुंधती एक मोठी गायिका बनणार आणि खूप मोठी प्रसिद्धी मिळवणार असे भाकीत या पात्राबद्दल व्यक्त केले जात आहे. मधल्या काळात संजना आणि अनिरुद्ध यांचा संसार सुरळीत चालणार की मोडीत निघणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे कारण ज्या कारणामुळे अनिरुद्ध अरुंधतीसोबत घटस्फोट घेतो नेमके तेच कारण त्याच्या आयुष्याला मोठी कलाटणी देणारे ठरणार आहे. मालिकेचे हे रंजक वळण अरुंधती गेल्यावर तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार. तेव्हा अनिरुद्धची होणारी अधोगती आणि अरुंधतीची उन्नती मालिकेतून लवकरच प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे.