आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड लोकप्रियता मिळवताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. त्यामुळे मालिकेत अरुंधतीला घरकामात मदत करणारी त्यांची कामवाली अर्थात विमलचे पात्र कोकणी बाजातील बोलण्याने प्रेक्षकांना भावले आहे. विमलचे पात्र अभिनेत्री सीमा घोगळे यांनी साकारले आहे. सीमा घोगळे या मराठी चित्रपट मालिका तसेच नाट्य अभिनेत्री आहेत. खुलता कळी खुलेना, गोठ, एक होती राजकन्या या मालिकेतून काम केलं आहे. शिवाय अनेक नाटकांतून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. सीमा घोगळे या प्रसिद्ध नाट्यकर्मी अनंत घोगळे यांच्या कन्या आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून अनंत घोगळे हे नाट्यसृष्टीशी संलग्न होते. मात्र ऑक्टोबर २०१८ साली वयाच्या ८३ व्या त्यांचे दुःखद निधन झाले. गेल्या ६० वर्षांपासून ते नाट्यक्षेत्रात कार्यरत होते. वस्त्रोद्योग विभागातून सन १९९३मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती मात्र तरीही घोगळे यांनी नाट्यचळवळीत स्वतःला वाहून घेतले होते. नोकरी करताना नाट्यक्षेत्राला वेळ देता येणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी राजपत्रित अधिकारीपदाची बढती स्वीकारली नाही. त्यांनी मासिके, नियतकालिके, स्मरणिका, दैनिकांतून नाट्यविषयक घडामोडींवर लेखन केले होते. ‘नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर स्मृती नाट्यसेवा’ पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांना मिळाले होते. अनंत घोगळे यांच्या प्रतिष्ठान अंतर्गत एकांकिका स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातून अनेक नवख्या कलाकारांना रंगभूमीवर आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून सरकारच्या निर्बंधांमुळे ह्या स्पर्धांचे आयोजन करण्यात दिरंगाई होत होती. पण नुकतेच निर्बंध हटवल्याने आता पुन्हा नव्या दमाने ह्या एकांकिका स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे.

अशी माहिती सीमा घोगळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे , याबाबत त्या नेमक्या काय म्हणाल्या ते पाहुयात…. “मागची दोन वर्षे खूप प्रयत्न करतेय पण ह्यावर निर्बंध घालण्यात आले म्हणून मनात असूनसुद्धा काही गोष्टी करता आल्या नाहीत.. आता हळूहळू सगळं सुरळीत होतंय आणि यापुढेही ते तसंच सुरळीत राहावं ह्यासाठी आपण सगळेच प्रार्थना करूया… बाबा, आज तुमचा तृतीय स्मृतिदिन …तुम्हाला विनम्र अभिवादन…”अनंत घोगळे प्रतिष्ठान” आयोजित “अनंत घोगळे करंडक” राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा लवकरच…अशी घोषणा सीमा घोगळे यानी केली आहे. त्यामुळे नवख्या कलाकारांना अनंत घोगळे प्रतिष्ठानच्या व्यासपीठावरून अभिनयाची चांगली संधी उपलब्ध होत आहे. येत्या काही दिवसातच याबाबत अधिक माहिती सविस्तर दिली जाईल असेही त्या म्हनाल्या . त्यांच्या या घोषणेचे अनेक कलाकारांनी स्वागतच केले आहे.