मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तसेच सुत्रसंचालिका म्हणून नाव लौकिक असलेल्या अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची कन्या नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. संपदा कुलकर्णी यांची कन्या “शर्वरी कुलकर्णी” काही दिवसांपूर्वीच विवाहबद्ध झाली असून आज तिने आपल्या लग्नसोहळ्याचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. गेल्या महिन्यात शर्वरी कुलकर्णी ही मुंबई स्थित विभव बोरकर यांच्या सोबत विवाहबद्ध झाली आहे परंतु त्या क्षणाच्या आठवणी आजच तिने इंस्टाग्रामवरून शेअर केल्या आहेत.
शर्वरी कुलकर्णी ही देखील आपल्या आईप्रमाणेच एक अभिनेत्री म्हणून परिचयाची झाली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेतून शर्वरीने अभिनय क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले होते. या मालिकेतून तिने आनंदी च्या मावशीची म्हणजेच मीराची भूमिका साकारली होती. पदार्पणातच मिरा ही एक आव्हानात्मक भूमिका तिच्या वाट्याला आली होती. शर्वरीने ललित कला केंद्र मधून अभिनयाचे धडे गिरवले आहेत याशिवाय नृत्य आणि वेगवेगळ्या रेसिपीज बनवण्याची देखील तिला भारी हौस आहे. संपदा जोगळेकर कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी हे दाम्पत्य गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या गावी सेंद्रिय शेती करत आहेत.
“आनंदाचे शेत” च्या माध्यमातून कित्येकांना त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचे प्रोत्साहन दिले आहे. अभिनेत्री, लेखन, निवेदन, सूत्रसंचालन, नाट्य दिग्दर्शिका आणि आता एक यशस्वी शेतकरी म्हणून संपदा कुलकर्णी यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन क्षेत्रातून थोडासा विसावा मिळावा याहेतूने त्यांनी आपली पावले शेतीकडे वळवली यात त्यांचे पती राहुल कुलकर्णी यांचीही मोलाची साथ मिळाली. आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी शर्वरी हिने देखील अभिनयाचे धडे गिरवले. पदार्पणातच मालिकेत महत्वाची भूमिका साकारण्याची एक संधी तिला मिळाली. आता ती विवाहबद्ध झाली असली तरी यापुढे मनोरंजन क्षेत्रात ती काम करेल की नाही हे येत्या काही काळातच समजेल पण तुर्तास तिला वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…