मालिका, चित्रपट तसेच नाट्य अभिनेते किरण माने हे नेहमीच आपल्याला आयुष्यात आलेले अनुभव किंवा कलाकारांबद्दलची आपली भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. सध्या स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून ते विलास ची दमदार भूमिका साकारत आहेत. आजच्या घडीला एखादा कलाकार कला क्षेत्रात आपला जम बसवू पाहत असेल तर त्याला मागे कसे खेचले जाईल किंवा त्याची कशी बदनामी केली जाते हे सत्य आपल्या शब्दातून मांडले आहे पाहुयात या पोस्टमध्ये ते नक्की काय म्हणाले ते…

जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती… उसकी बदनामी शुरू की जाती है ! …मराठी कलाप्रांताचा गळा ठरावीक बुरसटलेल्या विचारधारेच्या गटानं आपल्या जबरदस्त पकडीत दाबून धरलाय दोस्तांनो ! तुम्हाला माहितीय, किरण माने हवेतल्या गोष्टी बोलत नाही. तुकारामाची पताका हातात घेतलेल्या वारकर्याच्या रक्तात “अनुभवावाचून सोंग संपादणे” कदापी येणार नाही ! तुम्ही प्रतिभावान असाल-मेहनती असाल-आपलं काम खणखणीत वाजवत असाल… पण तुम्ही त्यांच्या ‘गटात’ न बसणारे – त्यांची विचारधारा न मानणारे असाल तर तुम्हाला मराठीत भयानक आणि जीवघेण्या संघर्षातून पुढे जाण्याशिवाय तरणोपाय नाही !! हो, तुम्ही कलावंत म्हणून सुमार दर्जाचे असाल, तर मात्र तुम्ही ‘सुरक्षित’ आहात. त्यांना शेजारी उभी करायला अशी बुजगावणी लागतातच.
पण अस्सल प्रतिभावंतांनो, तुम्ही कित्त्तीही जीव ओतून – प्रामाणिकपणे चांगलं काम करा…

रोज ‘मरण’ अनुभवत पुढं जात रहाणं, नाहीतर सरळ हे क्षेत्र सोडून आपला कामधंदा सांभाळणं किंवा आत्महत्या करणं या तीन गोष्टींशिवाय हे लोक तुमच्यापुढं पर्याय ठेवत नाहीत. आपला तुकोबाराया या छळाबाबत बोलून गेलाय: “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग… अंतर्बाह्य जग आणि मन ! जिवाहि आगोज पडती आघात… येऊनिया नित्य नित्य वारि !! तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे… अवघियांचे काळे केले तोंड !!!” …’ते’ आधी तुम्हाला दुर्लक्षित करतात… नंतर तुम्हाला ‘डावलणं’ सुरू होतं… त्यानंतर तुम्हाला अपमानीत केलं जातं…… तरीही तुम्ही आपल्या कामाशी प्रामाणिक राहून नाणं वाजवत राहीलात तर तुमची खोटी ‘बदनामी’ हा हुकमी एक्का काढला जातो…त्यानंतरही तुम्ही जिद्दीनं, चिवटपणे, न थकता आपला झेंडा रोवत ‘अवघियांचे तोंड काळे’ करत राहिलात, तरच तुम्ही टिकू शकता ! या क्षेत्रात ‘लाईफलाॅंग करीयर’ करू इच्छिणार्या सर्वसामान्य ‘वर्गातील’ कलाकारांनो… कळकळीची विनंती आहे… एकतर ‘पूSSSर्ण’ तयारीनिशी… संपूर्ण ताकदीनं या किंवा येऊ नका.- किरण माने.