देवमाणूस मालिकेत मंजुळाच्या भूमिकेने अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. या भूमिकेमुळे प्रतीक्षा जाधव टीव्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या अगोदरही प्रतिक्षाने चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत परंतु मंजुळाची भूमिका तिच्यासाठी अधोरेखित करणारी ठरली आहे. ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रतिक्षाने मराठी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. कॉलेजमध्ये असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधून रंगभूमीवर तीने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.
अरे देवा, जखमी पोलीस, तात्या विंचू लगे रहो, हे मिलन सौभाग्याचे, मोलकरीणबाई, छोटी मालकीण, क्राईम पेट्रोल, करून गेलो गाव या तिने अभिनित केलेल्या नाटक, चित्रपट तसेच मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्रतीक्षा केवळ अभिनेत्री नसून पुण्यात तिचा स्वतःचा व्यवसाय देखील आहे. मांजरी रोड, हडपसर, पुणे येथे “APPLE” नावाने तिचे स्वतःचे वूमन सलून आहे. या व्यवसायात तिची भरभराट होताना दिसत आहे. अभिनयासोबतच आपला स्वतःचा एखादा बिजनेस असावा असे प्रतिक्षाला नेहमी वाटत असे. ऍपलच्या माध्यमातून तिची ही ईच्छा आता पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे. प्रतीक्षा सध्या झी युवा वरील तुझं माझं जमतंय मालिकेत काम करत आहे. या मालिकेतून ती पम्मीच्या दमदार भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका तिच्याकडे ओघानेच आली असे म्हणायला हरकत नाही. कारण पम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या रात्रीस खेळ चाले ३ मालिकेत शेवंताची भूमिका गाजवत आहे. त्यामुळे अपूर्वाने तुझं माझं जमतंय ही मालिका पुढे न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रतीक्षाकडे ही भूमिका ओघानेच आलेली पाहायला मिळाली. अपूर्वाने रंगवलेली पम्मी प्रतीक्षा देखील तितक्याच ताकदीने साकारत आहे हे तिच्या अभियावरून लक्षात येते.