सोशल मीडियावर ट्रोल होणं हे कुठल्याही कलाकारांसाठी नवी गोष्ट नाही. अनेकदा त्यांनी कसे कपडे घालावेत, कसे वागावे, किंवा कलाकारांनी राजकारणावर भाष्य करू नये अशीही मतं ट्रोलर्स व्यक्त करताना दिसतात. अभिनेत्रीच्या बाबतीत म्हणायचे झाले तर तू साडीतच छान दिसते असे कपडे घालू नकोस मराठी अभिनेत्रीला हे शोभत नाही अशाही खोचक प्रतिक्रिया चाहत्यांकडून मिळत असतात. याबाबत अभिनेत्री पूजा चव्हाण तर म्हणते की माझ्या पोस्टवर जर कोणी विरोधी प्रतिक्रिया दिली तर मी ती लगेचच डिलीट करून टाकते यामुळे ती पोस्ट वाचणाऱ्या आणि पाहण्याऱ्याचीही मानसिकता बदलून जाते. एकाने ट्रोल केले की त्यावर दुसराही हमखास तशीच प्रतिक्रिया देतो.

पूजा सावंत प्रमाणेच अनेक मराठी अभिनेत्रींना नेहमीच ट्रोलर्सना सामोरे जावे लागते. याबाबत स्पृहा जोशीला देखील अनेक कारणास्तव ट्रोल केले जात आहे. नुकतेच स्पृहा जोशीने अलिबागला शूटिंगला असताना एक घडलेला किस्सा शेअर केला होता. या व्हिडिओत ती सेटवरील किचनमध्ये सुके बोंबील गॅसवर भाजताना दिसली. सुक्या बोंबोलची एक सिक्रेट रेसिपी देखील तिने या व्हिडिओसोबत शेअर केली होती. त्यावर अनेकांनी स्पृहाला ट्रोल केलेले दिसून आले. जोशी ना तुम्ही…जोशी आणि सुके बोंबील odd combination अशा प्रतिक्रिया ट्रोलर्सकडून मिळाल्यावर अनेकांनी तिची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. यावर स्पृहाने देखील एका मुलाखतीत सांगितले की, ट्रोलर्स खिल्ली उडवतात त्याकडे दुर्लक्ष करायचे, मला जे पटते ते मी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच व्यक्त करत असते. मी काय घालावे काय करावे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी पोस्ट केलेल्या कुठल्याही गोष्टीवर चाहते प्रतिक्रिया देणारच…हा ही निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे. त्यामुळे अशा गोष्टींना मी जास्त महत्व देत नाही असे स्पृहा जोशीचे मत आहे. ट्रोलर्स त्यांचं काम करतात, मी माझं काम करते…