ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे ४ जून रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी सृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली जी कधीही भरून येणार नाही. आशा काळे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, प्रिया बेर्डे या कलाकारांनी सुलोचना दिदींसोबतच्या आठवणी मिडियासोबत शेअर केल्या त्यावेळी हे सगळेच कलाकार जड अंतकरणाने दिदींना अखेरचा निरोप देताना दिसले. सुलोचना लाटकर यांना मुलगी कांचन घाणेकर यांनी अग्नी दिला. दिदींना त्या आई म्हणून नव्हे तर आत्या म्हणूनच हाक मारायच्या. कारण सुलोचना दीदी शूटिंगनिमित्ताने सतत दौऱ्यावर असायच्या म्हणून मग त्यांनी कांचनला आपल्या भावंडाकडे ठेवले होते. दिदींच्या भावंडांचा गोतावळा खूप मोठा होता त्यांची मुलं दिदींना आत्या म्हणत तेव्हा कांचनसुद्धा आपल्या आईला आत्या म्हणूनच हाक मारत असत. रश्मी घाणेकर ही दिदींची नात. आपल्या आजी साठी रश्मीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
त्यात ती म्हणते की, “एक स्त्री जी सामर्थ्य, प्रेम आणि सौंदर्याचे प्रतीक होती… तिने एक सुंदर आणि परिपूर्ण असे आयुष्य जगले आहे. ४ जून २०२३ रोजी आमची आजी सुलोचना लाटकर यांनी या जगाचा निरोप घेतला, अतिशय जड अंतःकरणाने आम्ही त्यांना निरोप दिला. त्या व्यक्तिशः दुस-या जगात गेल्या असतील पण आपल्या प्रत्येकाच्या सोबत असलेल्या सर्व सुंदर आठवणींसह त्या कायम आपल्या हृदयात जिवंत राहतील. तिच्या नसण्याने आमचे घर पूर्वीसारखं कधीच जाणवणार नाही. तिने असाधारण आयुष्य जगले आहे आणि मला खात्री आहे ती त्या दुसऱ्या जगातही तसेच आयुष्य जगत असेल. त्यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून येणार नाही. या कठीण काळात मला आणि माझ्या कुटुंबाला तुम्ही सावरण्याचे बळ दिले , आमच्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.”