आजच्या या युगात मोठमोठे वाडे, बंगले खूप कमी प्रमाणात पहायला मिळतात. जुन्या विटांचं आणि दगडांचं नक्षीदार काम असलेल्या वाड्यामध्ये राहायला कोणाला नाही आवडणार. अशातच मराठी सिनेविश्वातील अभिनेता शशांक केतकर हा साताऱ्यात येऊन पोहोचला आहे. साताऱ्यामध्ये त्याचा प्रशस्त वाडा असून तो सध्या जुन्या आठवणींना उजाळा देत वाड्याची सैर करताना दिसतोय. परंतु हा वाडा आता कधीही दिसणारं नाही असं म्हणत त्याने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे.
शशांकचा वाडा साताऱ्यातील नेने चौक येथे असून, त्याच्या वाड्याचं नाव नेने वाडा असं आहे. शशांकने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतोय की,” सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला तो हा नेने वाडा. खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घराऐवजी, अनेक घरांची सात-आठ मजली इमारत उभी राहील. आता हा वाडा फक्त काही फोटोज आणि आठवणीतच शिल्लक राहील”. असं कॅप्शन देत त्यांने ही पोस्ट शेअर केली आहे.
शशांकने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो त्याच्या कुटुंबीयांसोबत पाहायला मिळतोय. त्याचा हा वाडा खरोखर जुन्या काळातील घरांची आठवण करून देणारा आहे. त्याच्या वाड्याला छोट्या छोट्या खिडक्या असून, पुरातन काळातली बाल्कनी सुद्धा दिसत आहे. सोबतच त्याने त्याच्या वाड्यामधील देवघराचा एक सुंदर फोटो देखील पोस्ट केला आहे. “देवघरामध्ये बसायला पाठ, त्याच्यावरती टाळ, आजूबाजूला तांबे पितळेची भांडी हे सर्व दृश्य पाहून छान वाटत आहे”, अशी कमेंट त्याच्या एका चाहत्याने केली आहे. तर आणखीन एक जण म्हणतोय की,” आताच्या काळात असे प्रशस्त वाडे पाहायला मिळत नाहीत. वाडा संस्कृती फारच छान आहे. परत असे होणे नाही. आता फक्त आठवणींमध्येच वाडे बघायचे”. अशा प्रकारच्या कमेंट शशांकच्या चाहत्यांनी केली आहे.