सर्कसची कमाई पाहून पुढचे काही दिवस रोहित शेट्टी चित्रपट बनवण्याच्या भानगडीत पडणार नाही

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ हा बहुचर्चित बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सफसेल आपटला आहे. गेल्या तीन दिवसांच्या आकडेवारीवरून आता रोहित शेट्टी पुढचे काही दिवस तरी चित्रपट बनवण्याच्या भानगडीत पडणार नाही असेच काहीसे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सर्कस या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची टीम मराठी इंडस्ट्रीत खेटे घालताना दिसली. चला हवा येऊ द्या नंतर ही टीम महाराष्ट्राची हास्यजत्रा या मंचावर देखील दाखल झाली होती. त्यावेळी रोहित शेट्टीने मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटात घेण्याचे कारण सांगितले होते. मराठी कलाकार एकदम साधे पण तेवढेच प्रतिभावंत असतात. या कलाकारांमध्ये कुठल्याही परिस्थितीत काम करण्याची जिद्द असते. माझे चित्रपट जेवढी कमाई करतात त्यातील ६० टक्के वाटा महाराष्ट्रातून मला मिळतो.’ असे म्हणून त्याने मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

director rohit shetty
director rohit shetty

सर्कस चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे, अजय देवगण, जॉनी लिव्हर, जाकलीन फर्नांडिस, वरुण शर्मा, मुरली शर्मा सह या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अश्विनी कळसेकर, विजय पाटकर, उदय टिकेकर सारखे मराठी कलाकार देखील दिसले. मात्र हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी कमाल घडवू शकला नाही. अवघ्या तीन दिवसात या चित्रपटाला २० कोटींचा आकडा देखील पार करणे शक्य झाले नाही त्यामुळे सर्कसला प्रेक्षकांनी नाकारल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. २३ डिसेंबर रोजी सर्कस चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या दिवशी चित्रपटाला देशभरातून ३२०० स्क्रीन्स मिळाल्या. मात्र या दिवशी चित्रपटाने केवळ ६.२५ कोटींचा पल्ला गाठला. त्यानंतर शनिवारी वीकेंडला प्रेक्षकांची गर्दी जमते मात्र यादिवशी उलट चित्र पाहायला मिळाले. चित्रपटाची कमाई वाढण्यापेक्षा ती कमी होऊन केवळ ६ कोटींचाच गल्ला या चित्रपटाने आपल्या खात्यात जमा केला. रविवारी ख्रिसमसचे औचित्य साधून बॉक्स ऑफिसवर कमाल घडेल अशी आशा असताना तिसऱ्या दिवशी जेमतेम ७.२५ कोटींचा गल्ला या चित्रपटाने जमवलेला दिसला. एकीकडे प्रेक्षक चित्रपटांकडे पाठ फिरवतात असे म्हटले जाते त्याच ठिकाणी अवतार २ या चित्रपटाने मात्र ही बाजी पलटवलेली पाहायला मिळाली.

rohit shetty circus movie
rohit shetty circus movie

शुक्रवारी अवतार २ या चित्रपटाने १२ कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांनी या चित्रपटाला तुफान गर्दी केलेली दिसली. शनिवारी २०.७५ कोटी आणि रविवारी २४ कोटीं पर्यंत मजल मारलेली दिसली. त्यामुळे अवघ्या तीन दिवसातच अवतार २ चित्रपट ५६ कोटींच्या वर कमाई करताना दिसला. या कमाईवरून प्रेक्षक चित्रपट पाहायला गर्दी करतात हे स्पष्ट झाले आहे. याचा फटका आता बॉलिवूड चित्रपटांना बसला असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. सर्कस चित्रपट बनवण्यासाठी १५० कोटींचा खर्च आला असे म्हटले जाते. मात्र अवघ्या तीन दिवसांची कमाई पाहता हा चित्रपट १०० कोटीं पर्यंत तरी मजल मारणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण जिथे वीकेंडला प्रेक्षकांचा ७ कोटींपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला तिथे पुढच्या आठवड्यात हा आकडा कमी होत गेलेला पाहायला मिळतो. त्यामुळे रोहित शेट्टी पर्यायाने चित्रपटाच्या निर्मात्याला मोठे नुकसान सोसावे लागणार असेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सर्कस हा बिग बजेट आणि बिग स्टारर मुव्ही आहे. भली मोठी स्टार कास्ट असूनही हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना खेचून आणण्यात अयशस्वी ठरला आहे.

Leave a Comment