अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला वेड हा मराठी चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची प्रतीक्षा आता तीन दिवसात संपणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जेनेलिया आणि रितेशने कोल्हापूर येथे हजेरी लावली होती. तिथे जाऊन महालक्ष्मीचे दर्शन त्यांनी घेतले होते. रितेश आणि जेनेलिया ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे काही पत्रकारांना आयोजकांनी धक्काबुक्की केली होती. हॉटेलमधुन त्या पत्रकारांना बाहेर काढण्यात आले ही खंत त्यांनी रितेशजवळ बोलून दाखवली होती. त्यावेळी रितेशने या झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली होती. मात्र रितेशची चूक नसतानाही त्याने त्या पत्रकारांची माफी मागितल्याने प्रेक्षकांची मनं त्याने जिकलेली दिसली.
रितेश खऱ्या आयुष्यात देखील खूप जबाबदार व्यक्ती म्हणून वावरताना पाहायला मिळाला आहे. आपल्या मुलांवर देखील त्याने तसेच संस्कार केले आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांच्या मुलांच्या तुलनेत रितेश जेनेलियाची मुलं खूपच संस्कारी आहेत असे अनेकदा बोलले जाते. मिडियासमोर आल्यानंतरही त्याची ही दोन्ही मुलं हात जोडून मीडियाला प्रतिसाद देत असतात. ते पाहून राहील आणि रियान बद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जातात. आपण एवढी वर्षे या इंडस्ट्रीत काम केलं मात्र आपल्या आईने सेटवर कधीच उपस्थिती लावली नाही हे तो आई जवळ बोलताना म्हणाला. त्यावर तू मला कधीच सेटवर बोलावलं नाहीस अशी छोटीशी तक्रार केली. ही तक्रार रितेशच्या जिव्हारी लागली आणि त्याने आईसाठी एक खास योजना आखली. या तक्रारीबाबत रितेश मुलाखतीत म्हणतो की, ‘ २० वर्षे झाली मी या इंडस्ट्रीत काम करतोय. या २० वर्षात माझी आई माझ्या सेटवरती कधीही आल्या नाहीत.माझे वडील सुद्धा असे सेटवर कधी आले नव्हते कारण सेटवर यायचं असेल तर अनेक प्रोटोकॉल पाळावे लागतात, सगळे नियम पाळावे लागतात. ज्या कामासाठी आपण जाणार आहोत ते काम सुद्धा थांबलं असतं.
पण एकदा मी सहज म्हणून माझ्या आईला विचारलं की, तुम्ही माझ्या सेटवर कधी का नाही आलात तर त्या म्हणाल्या की ,तू कधी बोलवलच नाहीस मला. मी विचार केला की, आपण इतकी वर्षे झाली काम करतोय म्हणजे मी जवळपास ४० ते ५० चित्रपटातून काम केलंय आपण आईंनाच बोलावलं नाही कधी सेटवरती?. ही गोष्ट माझ्या डोक्यात होती. आपण पहिल्यांदा त्यांना सेटवर जेव्हा बोलावू तेव्हा वेड च्या शूटला पहिला क्लॅप ते देतायेत हे माझ्या आयुष्यातलं दिग्दर्शनातील मोठं पाऊल , ज्या शॉटमध्ये मी आणि जेनेलिया दोघेही आहोत , सोबत अजय अतुल यांचं गाणं चालू आहे . आई मूळ शॉट देतायत ,ऍक्शन रिहान म्हणतायेत, आणि कट राहील म्हणतायेत आणि तो दिवस सुद्धा जेनेलितयांच्या आई आणि माझ्या सासूबाई यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी हे सगळं छान जुळून आलं होतं’. रितेशच्या या कृत्याने त्याने आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत.