स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील सर्व पात्रे प्रेक्षकांना फार आवडतात. मधूराणी प्रभुलकर हिने अरुंधती हे पात्र साकारत स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने चहात्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये अरुंधती म्हणून दुसरी ओळख मिळवणारी अश्विनी महांगडे हिच्या अनघा या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहे. मालिकेमध्ये दाखवल्याप्रमाणे अनघा आणि अभीमध्ये वाद सुरू होते. परंतु सध्या दोघांनी एकमेकांना वेळ देऊन समजून घ्यायचे ठरवले आहे. अशातच अनघाच्या म्हणजेच अश्विनीच्या ऑफस्क्रीन होणाऱ्या जोडीदारासोबतचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. खुद्द अश्विनीने तिच्या इंस्टाग्रामवर जोडीदारासोबतची एक व्हिडिओ शेअर केली आहे. अश्विनीच्या जोडीदाराचे नाव निलेश जगदाळे असं असून ते दोघे एकमेकांसोबत फारच छान दिसत आहेत.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अश्विनी आणि निलेश एका लग्न समारंभामध्ये गेल्याचे दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये निलेश अश्विनीचा विस्कटलेला घागरा नीट करताना दिसत आहे. “प्रणवच्या लग्नामध्ये आमच्या @ vinuda_makeover यांनी टिपलेले सुंदर क्षण….. “प्रेम” या शब्दाला एका भावनेत कैद नाही करता येणार. अनेक सुख – दुःख: , समाधान, शांती, संकट, परीक्षा असे एक ना अनेक गोष्टीतून जाण्याचा प्रवास आहे तो. आलेले कठीण प्रसंग प्रेमाला अधिक आकार देत असतात. त्यातून बाहेर पडता नाही आले तर थोडे थांबा, विसावा घ्यावा आणि परत एकदा तो प्रवास करण्यासाठी सज्ज व्हावे. एक गोड, सुंदर नातं म्हणजे काय? खरे तर खूप लोक यावर छान छान बोलतात. आपण बऱ्याच ठिकाणी “नातं” यावरचे लेख वाचतो. पण माझ्या मते तो एक अनुभव आहे. हजारो चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, स्वभाव वेगवेगळे असतात आणि प्रत्येकामध्ये गुण, दोष असतात. पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत कोण आहे यावर त्या व्यक्तींचे नाते ठरते. प्रवासा प्रत्येकाचा स्वतंत्र असतो पण त्या प्रवासात आपली माणसं सोबत असतील तर तो प्रवास सुखद आणि सोपा होतो”. अशा भल्या मोठ्या कॅप्शन्सह अश्विनीने ही व्हिडिओ शेअर केली आहे. तिच्या या व्हिडिओला चहात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, तिचं कौतुक देखील केलं आहे.